अमरावती: पोलिसांनी उधळली तरुणाईची मद्य पार्टी ! अल्पवयीन मुला-मुलींसह १००-१५० जण ताब्यात
By प्रदीप भाकरे | Updated: July 14, 2025 00:14 IST2025-07-14T00:04:30+5:302025-07-14T00:14:57+5:30
अमरावतीच्या शंकर नगर परिसरात पोलिसांची धाड

अमरावती: पोलिसांनी उधळली तरुणाईची मद्य पार्टी ! अल्पवयीन मुला-मुलींसह १००-१५० जण ताब्यात
प्रदीप भाकरे, अमरावती: येथील शंकर नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये सुरू असलेली तरुणाईची मद्य पार्टी गुन्हे शाखा युनिट दोनने उधळली. १३ जुलै रोजी रात्री नऊच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. शंभर ते दीडशे तरुण-तरुणींना यावेळी ताब्यात घेतले. यामध्ये बहुतांश अल्पवयीन मुला-मुलींचा समावेश आहे. त्या हॉटेलमध्ये फेक मॅरेज इव्हेंट या पाच दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
फेक मॅरेज ट्रेंड म्हणजे काय? तरूणाईमध्ये वाढलीये भलतीच क्रेझ
कशी केली कारवाई?
फेक मॅरेज इव्हेंट पार्टीमध्ये काही अल्पवयीन मुला-मुलींना दारू सर्व्ह केली जात आहे, अशी माहिती गुन्हे शाखा युनिट २ ला मिळाली होती. त्यानुसार रविवारी रात्री ९च्या सुमारास तेथे धाड टाकण्यात आली. १८ वर्षाखालील मुला-मुलींना पिण्यासाठी दारू दिली जात असल्यामुळे संबंधित हॉटेल मालकांवर कारवाई करण्यात येणार आहे. उशिरा रात्री १२ वाजेपर्यंत ही कारवाई सुरू होती.
गुन्हे शाखा युनिट टूचे प्रमुख संदीप चव्हाण व एपीआय महेश कुमार इंगोले यांच्या पथकाने ही धाड टाकली. अल्पवयीन मुला-मुलींची संख्या नेमकी किती, हे जाणून घेण्यासाठी सर्वांची नावे व वय तपासले जात आहेत. १८ वर्षाखालील मुलामुलींना बारमध्ये दारू देणे व पुरवणे कायदेशीर गुन्हा आहे. त्यामुळे हे प्रकरण गंभीर असून संबंधित हॉटेल मालकावर कारवाई करण्यात येत आहे. वृत्त लिहोस्तोवर ती कारवाईची प्रक्रिया सुरू होती. हॉटेल मालक, आयोजकांसह त्या तरुण-तरुणींना राजापेठ पोलीस ठाण्यात आणण्यात आले आहे.