छोटे ट्रान्सफर, बनावट नोंदी अन् केला कोट्यवधींचा घोटाळा; एएआय मॅनेजरने लांबवले २३२ कोटी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2025 14:28 IST2025-09-02T14:26:03+5:302025-09-02T14:28:30+5:30

सीबीआयने भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या मॅनेजरला कोट्यवधींचा घोटाळा केल्याप्रकरणी अटक केली.

Airports authority senior manager embezzled Rs 232 crore arrested by CBI | छोटे ट्रान्सफर, बनावट नोंदी अन् केला कोट्यवधींचा घोटाळा; एएआय मॅनेजरने लांबवले २३२ कोटी

छोटे ट्रान्सफर, बनावट नोंदी अन् केला कोट्यवधींचा घोटाळा; एएआय मॅनेजरने लांबवले २३२ कोटी

CBI Arrests Airport Authority Manager: केंद्रीय अन्वेषण विभागाने भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या एका वरिष्ठ व्यवस्थापकाला अटक केली आहे. एएआयच्या मॅनेजवर त्याच्या वैयक्तिक खात्यात २३२ कोटी रुपये ट्रान्सफर केल्याचा आरोप आहे. एएआयकडून तक्रार मिळाल्यानंतर सीबीआयने आरोपीविरुद्ध एफआयआर नोंदवला. आरोपी मॅनेजरने २०१९ ते ऑगस्ट २०२२ पर्यंत हळूहळू सुमारे २३२ कोटी रुपये त्याच्या वैयक्तिक खात्यात ट्रान्सफर केले. हे करताना त्याने तीन वर्षे कोणालाही काहीच कळू दिले नाही. मात्र जुनी कागदपत्रे तपासताना गैरप्रकार झाल्याचा दिसल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आलं.

डेहराडून विमानतळावर तैनात असलेल्या एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाचा वरिष्ठ व्यवस्थापक राहुल विजय याने असा घोटाळा केला की तो समोर आल्यानंतर अनेकांना विश्वास ठेवणे कठीण जात आहे. सीबीआयने सांगितले की, आम्ही आरोपी राहुल विजयला अटक केली आहे. तो २०१९ ते २०२३ पर्यंत एएआयच्या डेहराडून विमानतळावर वित्त आणि लेखा शाखेचा प्रमुख होता. सध्या तो जयपूर विमानतळावर त्याच पदावर तैनात आहे. गेल्या आठवड्यात, त्याच्या जयपूरमधील कार्यालय आणि घराची झडती घेण्यात आली, ज्यामध्ये मालमत्तेशी संबंधित कागदपत्रे आणि मौल्यवान सिक्युरिटीजसह अनेक आक्षेपार्ह साहित्य जप्त करण्यात आले.

तपासादरम्यान, सीबीआयला आढळले की आरोपीने इलेक्ट्रॉनिक रेकॉर्डमध्ये छेडछाड केली होती. त्याने बनावट आणि कृत्रिम मालमत्ता तयार केल्या आणि काही मालमत्तेच्या वाढलेल्या किमती दाखवल्या. यासाठी, तो नोंदींमध्ये शून्य जोडत असे जेणेकरून तपासात ते पकडले जाऊ नये. अशा पद्धतीने आरोपीच्या वैयक्तिक बँक खात्यात सुमारे २३२ कोटी रुपये जमा करण्यात आले होते. बँक व्यवहारांच्या सुरुवातीच्या तपासात  आरोपीने नंतर हे पैसे सार्वजनिक पैसे हडप करण्यासाठी ट्रेडिंग खात्यांमध्ये हस्तांतरित केले होते.

वरिष्ठ अधिकारी जुन्या नोंदी तपासत असताना, त्यांना अॅसेट बुकमध्ये काही तफावत आढळली. खर्च आणि मालमत्तांचे आकडे जुळत नव्हते. प्रकरण गंभीर वाटताच, चौकशीसाठी एक समिती स्थापन करण्यात आली. तिथून राहुल विजयने स्वतःच्या मर्जीनुसार संपूर्ण व्यवस्था हादरवून टाकल्याचे उघडकीस येऊ लागले. त्यावेळी राहुल विजय हा विमानतळाच्या बँक खात्याचा अधिकृत स्वाक्षरी करणारा होता. म्हणजेच पैशांच्या व्यवहारांवर त्याचे पूर्ण नियंत्रण होते. त्याने या अधिकाराचा फायदा घेत एसबीआय बँकेतील एएआयच्या अधिकृत खात्यासाठी तीन वेगवेगळे युजर आयडी तयार केले. सुरुवातीला, कोणताही संशय येऊ नये म्हणून लहान रक्कम हस्तांतरित केली जात होती, पण हळूहळू ही रक्कम कोटींमध्ये बदलली.

२९ सप्टेंबर २०२१ रोजी राहुलने न्यू टर्मिनल बिल्डिंग फेज-१ इलेक्ट्रिकल वर्क प्रकल्प तयार केला. ज्याची किंमत ६७.८१ कोटी रुपये होती. पण दुसऱ्याच दिवशी त्याने  १८९ कोटी रुपये किमतीच्या १७ नवीन बनावट मालमत्ता दाखवल्या. मूळ १३ मालमत्तेची किंमत १३१.५८ कोटी रुपये होती. राहुलने त्यात बदल केला. अशाप्रकारे त्यांच्या खात्यात कोट्यवधी रुपये पोहोचले. याशिवाय, विविध खर्चाच्या नावाखाली सुमारे ४३ कोटी रुपये काढण्यात आले. २०१९ ते २०२२ पर्यंत हे सुरु होतं. कागदावर नवीन मालमत्ता, नवीन खर्च, वाढता प्रकल्प हे सगळं दिसत होतं. पण प्रत्यक्षात काहीच नव्हतं. त्याचे पैसे थेट राहुल विजयच्या खिशात जात होते.
 

Web Title: Airports authority senior manager embezzled Rs 232 crore arrested by CBI

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.