एका ऑम्लेटच्या तुकड्याने उघडलं हत्येचे रहस्य; मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी पोलिसांनी वापरलं 'AI' तंत्रज्ञान
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2026 14:54 IST2026-01-06T14:29:29+5:302026-01-06T14:54:45+5:30
मध्य प्रदेशात काही दिवसांपूर्वी झालेल्या हत्येचा छडा लावण्यास पोलिसांना यश आलं आहे.

एका ऑम्लेटच्या तुकड्याने उघडलं हत्येचे रहस्य; मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी पोलिसांनी वापरलं 'AI' तंत्रज्ञान
MP Crime: मध्यप्रदेशातील ग्वाल्हेरमध्ये २९ डिसेंबर २०२५ रोजी घडलेल्या एका थरारक हत्याकांडाचा पोलिसांनी अत्यंत कौशल्याने उलगडा केला आहे. दगडाने चेहरा ठेचून विद्रूप केलेल्या एका महिलेची ओळख पटवण्यासाठी पोलिसांनी चक्क आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि सीसीटीएनएस प्रणालीची मदत घेतली. एका ऑम्लेटच्या तुकड्यापासून सुरू झालेला हा तपास थेट आरोपीच्या अटकेपर्यंत पोहोचला असून धक्कादायक घटना समोर आली आहे.
२९ डिसेंबर रोजी भिंड रोडवरील नारायण विहार कॉलनीतील झुडपात एका ३५ वर्षीय महिलेचा अर्धनग्न अवस्थेत मृतदेह आढळला होता. आरोपीने महिलेची ओळख पटू नये म्हणून तिचे तोंड दगडाने पूर्णपणे ठेचून काढले होते. घटनास्थळी रक्ताने माखलेला दगड आणि काही कपडे पोलिसांना मिळाले. मात्र, सर्वात महत्त्वाचा पुरावा ठरला तो म्हणजे महिलेच्या स्वेटरच्या खिशात सापडलेला ऑम्लेटचा तुकडा.
महिलेचा चेहरा ओळखणे अशक्य असल्याने पोलिसांनी एआय तंत्रज्ञानाचा वापर करून तिच्या चेहऱ्याची प्रतिकृती तयार केली. हा फोटो पोलिसांच्या सीसीटीएनएसवर अपलोड करण्यात आला. या शोधमोहिमेत ३० ते ३५ वयोगटातील बेपत्ता महिलांची माहिती तपासली असता, हा चेहरा टिकमगढ येथील संगीता उर्फ सुनीता पाल हिच्याशी जुळला. ती नोव्हेंबर २०२४ मध्ये एकदा बेपत्ता झाली होती, ज्यामुळे पोलिसांकडे तिची जुनी नोंद होती.
२०० अंड्यांच्या गाड्या आणि ५० सीसीटीव्ही
खिशात सापडलेल्या ऑम्लेटचा सुगावा घेत पोलिसांनी शहरातील तब्बल २०० अंडी विक्रेत्यांकडे चौकशी केली. एका विक्रेत्याने ही महिला एका तरुणासोबत दिसल्याचे सांगितले. या माहितीवरून पोलिसांनी रेल्वे स्टेशन आणि परिसरातील ५० हून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. त्यातून पोलिसांना मुख्य संशयित सचिन सेनचा चेहरा स्पष्ट झाला.
बलात्कार, हत्या आणि अटकेचा थरार
पोलिसांनी सापळा रचून २६ वर्षीय सचिन सेन याला रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक ४ वरून ताब्यात घेतले. चौकशीत सचिनने आपला गुन्हा कबूल केला. सचिन पीडितेपेक्षा नऊ वर्षांनी लहान होता आणि त्याचे तिच्याशी प्रेमसंबंध होते. मात्र, संगीताचे दुसऱ्या कोणाशी तरी संबंध असल्याचा संशय त्याला होता. सचिनने संगीताला लग्नाचे आमिष दाखवून घटनास्थळी नेले. तिथे तिला आधी दारू पाजली, तिच्यावर बलात्कार केला आणि त्यानंतर दगडाने तोंड ठेचून तिची निर्घृण हत्या केली.