एकतर्फी प्रेमाचा भयानक शेवट; नर्ससमोर तरुणाने स्वतःला पेटवून पहिल्या मजल्यावरून मारली उडी; अहमदाबाद हादरले
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2025 15:14 IST2025-11-28T15:14:11+5:302025-11-28T15:14:57+5:30
नर्सच्या रुग्णालयात पोहोचून तरुणाने स्वतःला घेतले पेटवून; उपचारादरम्यान मृत्यू

एकतर्फी प्रेमाचा भयानक शेवट; नर्ससमोर तरुणाने स्वतःला पेटवून पहिल्या मजल्यावरून मारली उडी; अहमदाबाद हादरले
Gujarat Crime: गुजरातमधील अहमदाबादमध्ये एकतर्फी प्रेमातून एका २८ वर्षीय तरुणाने खासगी रुग्णालयात काम करणाऱ्या नर्ससमोर स्वतःला पेटवून घेतले आणि त्यानंतर रुग्णालयाच्या पहिल्या मजल्यावरून खाली उडी मारली. या धक्कादायक घटनेत गंभीररित्या भाजलेल्या तरुणाचा शुक्रवारी सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास घडली.
रुग्णालयात थेट पेट्रोल घेऊन दाखल
सरखेज पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत तरुणाचे नाव कामरान (२८) असे आहे. कामरानचे त्याच्या शेजारी राहणाऱ्या एका नर्सवर एकतर्फी प्रेम होते आणि तो गेल्या काही दिवसांपासून तिच्यावर प्रेमसंबंध स्वीकारण्यासाठी सतत दबाव आणत होता. या त्रासामुळे मुलीने आपल्या कुटुंबीयांनाही याची कल्पना दिली होती.
गुरुवारी रात्री कामरान थेट ती मुलगी काम करत असलेल्या खासगी रुग्णालयात पोहोचला. तिथे दोघांमध्ये याच विषयावरून जोरदार बाचाबाची झाली. याच दरम्यान कामरानने कपड्यांखाली लपवून आणलेली पेट्रोलची बाटली काढली आणि स्वतःच्या अंगावर ओतून घेतली. मुलगी आणि रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला, पण त्यापूर्वीच कामरानने लायटर काढून स्वतःला पेटवून घेतले.
कामरानला पकडण्याचा प्रयत्न इतरांनी केला, तेव्हा जळत्या अवस्थेतच त्याने रुग्णालयाच्या पहिल्या मजल्यावरून खाली उडी मारली. खाली असलेल्या एका डेंटल क्लिनिकच्या टीनच्या शेडवर तो कोसळला. लोकांनी तातडीने १०८ रुग्णवाहिकेच्या मदतीने त्याला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र, शुक्रवारी सकाळी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
नर्सही जखमी, उपचार सुरू
पोलिसांनी सांगितले की, घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचले. कामरानची प्रकृती गंभीर असल्याने त्याचे जबाब नोंदवता आले नाहीत. हा एकतर्फी प्रेमातून घडलेला प्रकार असल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे. या घटनेत कामरानला वाचवण्याच्या प्रयत्नात ती नर्सही थोडी भाजली असून, तिच्यावरही सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. डॉक्टरांच्या परवानगीनंतर तिचा जबाब नोंदवला जाईल, असे पोलिसांनी सांगितले.