रांची - वयाच्या १७ व्या वर्षी गुन्हेगारी क्षेत्रात पाऊल ठेवत सगळीकडे दहशत माजवणाऱ्या झारखंडच्या कुख्यात गँगस्टर अमन साहूचा पोलिसांनी एन्काऊंटर केला आहे. अमन साहूवर १०० हून अधिक गुन्हे नोंद आहेत. पोलीस त्याला छत्तीसगडच्या रायपूर येथून रांची येथे घेऊन जात होते. पलामू जिल्ह्यातील चैनपूर रामगड रोडवर गँगस्टर अमन साहूने पळण्याचा प्रयत्न केला. पोलीस जवानाची रायफल हिसकावून त्याच्यावर फायरिंग केले तेव्हा प्रत्युत्तर देत इतर पोलीस अधिकाऱ्यांनी त्याच्यावर गोळ्या झाडल्या.
मिळालेल्या माहितीनुसार, कुख्यात गुन्हेगार अमन साहूला रायपूर पोलीस चौकशीसाठी रांचीला घेऊन जात होती. त्यावेळी पोलिसांच्या वाहनाला अपघात झाला, त्याचाच फायदा घेत अमन साहू जवानाची रायफल हिसकावून पळण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्याला रोखण्याचा प्रयत्न केला असता त्याने गोळीबार सुरू केला. त्यानंतर पोलिसांनीही प्रत्युत्तर देत कुख्यात अमन साहूला गोळ्या घालून एन्काऊंटर केले.
मागील काळात झारखंडची राजधानी रांची इथल्या विपीन मिश्रा याच्यावर दिवसाढवळ्या गोळीबार झाला होता. त्यानंतर झारखंडच्या हजारीबाग येथे कुमार गौरव या व्यक्तीचीही हत्या झाली होती. या दोन्ही घटना अमन साहू टोळीने घडवून आणल्या होत्या. याच घटनेत अमन साहूला अटक करून त्याला चौकशीसाठी रांचीला आणलं जात होते. पलामू जिल्ह्यातील चैनपूर रामगड रोडवर पोलिसांच्या वाहनाला अपघात झाला. त्यानंतर अमन साहूला एन्काऊंटमध्ये ठार करण्यात आले. रांचीच्या मतवे गावातील अमन साहूवर झारखंडच्या विविध जिल्ह्यात १०० हून अधिक गुन्हे दाखल होते.
झारखंडमधील कोळसा व्यापारी, वाहतूकदार, कंत्राटदारांसोबत रिअल इस्टेट व्यावसायिक आणि बिल्डरही अमन साहूच्या दहशतीला घाबरत होते. तो सर्वांकडून खंडणी गोळा करायचा. जर एखाद्याने खंडणीला विरोध केला तर त्याची हत्या, अपहरण किंवा मारहाणीचा प्रकार घडायचा. कुठलीही मोठी घटना घडल्यास अमन साहू आणि त्याची टोळी सोशल मीडियातून त्याची जबाबदारी स्वत:वर घेत होते. कोळसा व्यावसायिक आणि कंपनी यांच्यात अमन साहूची भीती पसरली होती. अमन साहूला याआधीही अनेक गुन्ह्यात अटक करण्यात आली होती. १३ ऑक्टोबर २०२४ रोजी चाईबासा जेलमधून त्याला रायपूरच्या जेलमध्ये शिफ्ट केले होते. अमन साहूला विधानसभा निवडणूक लढायची होती. त्याने बडकागाव विधानसभा मतदारसंघातून अर्जही खरेदी केला परंतु हायकोर्टाने त्याला निवडणूक लढण्यास परवानगी दिली नाही.