After strangling a married woman, the body was thrown into a well | विवाहित महिलेचा गळा आवळून खून केल्यानंतर मृतदेह विहिरीत दिला फेकून  

विवाहित महिलेचा गळा आवळून खून केल्यानंतर मृतदेह विहिरीत दिला फेकून  

ठळक मुद्देरेखा राम शेडमाके (२८) रा. कारेगाव (बंडल) असे मृत विवाहितेचे नाव आहे. या प्रकरणाचा तपास ठाणेदार रामकृष्ण महल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक भरत चपाईतकर करीत आहेत.

पांढरकवडा (यवतमाळ): विवाहित महिलेचा गळा आवळून खून केल्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी तिचे प्रेत पेंढरी शेतशिवारातील एका विहिरीत फेकून देण्यात आले. ही घटना रविवारी घडली. याप्रकरणी सोमवारी पांढरकवडा पोलीस ठाण्यात अज्ञात मारेकऱ्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. रेखा राम शेडमाके (२८) रा. कारेगाव (बंडल) असे मृत विवाहितेचे नाव आहे. ती मूळची पेंढरी येथील रहिवासी असून तिचा विवाह कारेगाव (बंडल) येथील राम शेडमाके याच्यासोबत झाला होता.

अलीकडेच रेखा आपल्या माहेरी पेंढरी येथे आली होती. रविवारी दुपारी पेंढरी शेतशिवारातील कवडू करपते यांच्या शेतातील विहिरीत रेखा शेडमाके हिचे प्रेत तरंगत असल्याची माहिती पांढरकवडा पोलिसांना मिळाली. त्यावरून जमादार राहुल खंडागळे यांच्यासह पोलिसांची एक चमू घटनास्थळी पोहोचली. घटनास्थळाचा पंचनामा करून पोलिसांनी प्रेत ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठविले. त्याचा अहवाल सोमवारी पांढरकवडा पोलिसांना प्राप्त झाला. अहवालानुसार अज्ञात मारेकऱ्यांनी रेखाचा गळा आवळून खून केला व पुरावा नष्ट करण्यासाठी तिचे प्रेत विहिरीत फेकून दिल्याचे उघडकीस आले. हा खून नेमका कुणी केला, याचा तपास करण्याचे मोठे आव्हान पांढरकवडा पोलिसांपुढे उभे ठाकले आहे. याप्रकरणी पांढरकवडा पोलिसांनी अज्ञात मारेकऱ्याविरुद्ध भादंवि ३०२, २०१ अन्वये गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा तपास ठाणेदार रामकृष्ण महल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक भरत चपाईतकर करीत आहेत.

Web Title: After strangling a married woman, the body was thrown into a well

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.