कन्हैया लालनंतर आता नवीन जिंदाल यांना जीवे मारण्याच्या धमक्या आल्याने खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2022 14:35 IST2022-06-29T14:34:47+5:302022-06-29T14:35:24+5:30
Death Threats To Naveen Jindal :नवीन कुमार जिंदाल यांनी स्वतःला आणि संपूर्ण कुटुंबाला जीवे मारण्याच्या धमकीबाबत दिल्ली पोलिसांना तक्रार दाखल करण्यास सांगितले आहे.

कन्हैया लालनंतर आता नवीन जिंदाल यांना जीवे मारण्याच्या धमक्या आल्याने खळबळ
उदयपूर : राजस्थानमधील उदयपूरमध्ये टेलर कन्हैया लालच्या निर्घृण हत्येनंतर देशभरात खळबळ उडाली आहे. केवळ पक्षच नव्हे तर विरोधी पक्षांचे नेतेही या हत्याकांडाचा निषेध करत आहेत आणि आरोपींना कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी करत आहेत. नुपूर शर्माला पाठिंबा दिल्यानंतरच टेलर कन्हैयालालची उदयपूरमध्ये हत्या करण्यात आली आहे.
दुसरीकडे भाजपचे निलंबित नेते नवीन कुमार जिंदाल यांनाही जीवे मारण्याच्या धमक्या आल्या आहेत. नवीनच नाही तर त्याच्या संपूर्ण कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. नवीन कुमार जिंदाल यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर ट्विट करून ही माहिती दिली आहे.
कन्हैयालालाच्या शरीरावर २६ ठिकाणी वार, मान केली धडापासून वेगळी; पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये खुलासा
नवीन कुमार जिंदाल यांनी ट्विट करताना लिहिले की, आज सकाळी 6.43 वाजता मला तीन ईमेल आले आहेत, ज्यात उदयपूरमध्ये भाऊ कन्हैया लालचा गळा कापल्याचा व्हिडिओ जोडला आहे, ज्यात माझी आणि माझ्या कुटुंबाची मान कापण्याची धमकी देण्यात आली आहे. मी पीसीआरला कळवले आहे. नवीन कुमार जिंदाल यांनी स्वतःला आणि संपूर्ण कुटुंबाला जीवे मारण्याच्या धमकीबाबत दिल्लीपोलिसांना तक्रार दाखल करण्यास सांगितले आहे.