बुरखा न घातल्याने पत्नीसह २ लेकींची हत्या; चेहरा दिसू नये म्हणून १८ वर्षे काढलं नाही आधार कार्ड
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2025 18:45 IST2025-12-18T18:44:37+5:302025-12-18T18:45:16+5:30
आधार कार्ड किंवा रेशन कार्ड बनवलं तर पत्नीचा फोटो त्यावर येईल आणि तिचा चेहरा सर्वांना दिसेल, अशी त्याला भीती वाटत होती.

फोटो - ndtv.in
उत्तर प्रदेशातील शामली येथे पत्नी आणि दोन मुलींची हत्या करणाऱ्या आरोपी फारुखकडून पोलिसांनी हत्येसाठी वापरलेलं शस्त्र जप्त केलं आहे. फारुख हा इतका कट्टरपंथी होता की, लग्नानंतर १८ वर्षे त्याने आपल्या पत्नीचं आधार कार्डही काढलं नव्हतं. आधार कार्ड किंवा रेशन कार्ड बनवलं तर पत्नीचा फोटो त्यावर येईल आणि तिचा चेहरा सर्वांना दिसेल, अशी त्याला भीती वाटत होती. फारुख व्यवसायाने लग्नकार्यात जेवण बनवण्याचं काम करतो.
शामलीच्या पोलीस अधीक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार, तपासात असं समोर आलं आहे की, तो गेल्या १८ वर्षांपासून आपल्या पत्नीला नेहमी बुरख्यामध्येच ठेवायचा. पत्नीला माहेरी जायचे असल्यास तो स्वतः कॅब बुक करून द्यायचा. इतकेच नाही तर जेव्हा त्याचे सासरे घरी यायचे, तेव्हा तो पत्नीला स्वतःच्या वडिलांनाही भेटू देत नसे. त्याच्या कुटुंबात पत्नी ताहिरा (३२) व्यतिरिक्त आफरीन (१४), आसमीन (१०), सहरीन (७), बिलाल (९) आणि अरशद (५) अशी पाच मुलं होती.
'असा' उघड झाला हत्येचा कट
ताहिरा आणि तिच्या दोन मुली गेल्या सहा दिवसांपासून बेपत्ता होत्या. फारुखचे वडील दाऊद यांनी त्यांच्याबद्दल वारंवार विचारणा केली, परंतु फारुख टाळाटाळ करत होता. त्याने सांगितले की, त्यांना शामलीत भाड्याच्या घरात ठेवलं आहे. वडिलांना संशय आल्याने त्यांनी मंगळवारी संध्याकाळी पोलिसांना माहिती दिली.
पोलिसी खाक्या दाखवताच फारुखने गुन्ह्याची कबुली दिली. त्याने सांगितलं की, पत्नी अनेकदा त्याच्याशी वाद घालत असे आणि तिला स्वतःच्या पद्धतीने घर चालवायचं होतं. मुख्य म्हणजे एक महिन्यापूर्वी पत्नी बुरखा न घालता माहेरी गेली होती, ज्यामुळे समाजात आपली बदनामी झाली असा त्याचा समज होता.
ताहिराची गोळ्या झाडून हत्या
१० डिसेंबरच्या मध्यरात्री याच रागातून त्याने ताहिराची गोळ्या झाडून हत्या केली. गोळीचा आवाज ऐकून मोठी मुलगी आफरीन तिथे आली, तेव्हा तिलाही त्याने गोळी मारली. त्यानंतर दुसरी मुलगी सहरीन तिथे आली असता तिचा गळा दाबून खून केला. तिन्ही मृतदेह त्याने अंगणात शौचालयासाठी खोदलेल्या ९ फूट खोल खड्ड्यात पुरले आणि त्यावर विटा ठेवल्या.