सोनाराकडून 3.8 लाखाचे दागिन खरेदी करुन केवळ 10 हजार दिले, आरोपीला अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2022 13:08 IST2022-08-13T13:08:31+5:302022-08-13T13:08:51+5:30
वेंगुर्ला येथील घटना; साडेतीन लाखाचे दागिने खरेदी करून दिले होते फक्त दहा हजार

सोनाराकडून 3.8 लाखाचे दागिन खरेदी करुन केवळ 10 हजार दिले, आरोपीला अटक
वेंगुर्ला (सिंधुदुर्ग) : येथील एका सोन्याच्या दुकानातून ३ लाख ८८ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने खरेदी करून फक्त १० हजार रुपये देऊन फसवणूक करणाऱ्या सांगली येथील रणधीर भोसले याला वेंगुर्ला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ३ ऑगस्टला वेंगुर्ला कलानगर रामेश्वर कॉम्प्लेक्स मधील श्री स्वामी समर्थ ज्वेलर्सचे मालक प्रशांत सदाशिव मालवणकर यांच्या सोन्याच्या दुकानातून आरोपी रणधीर राजेंद्र भोसले (रा. सांगली) याने एकूण ३ लाख ८८ हजार रुपयाचे सोन्याचे दागिने खरेदी करून त्या बदल्यात मालवणकर यांना फक्त १० हजार रुपये व त्यांच्या बँक खात्यावर फक्त एक रुपया ट्रान्सफर करून मालवणकर यांची फसवणूक केली. तसेच त्यानंतर आरोपी हा फरार होता.
मालवणकर यांनी वेंगुर्ला पोलिसात याबाबत तक्रार दिली होती. गुन्ह्यातील आरोपी हा हुकेरी पोलीस ठाणे येथे मिळून आल्याने आरोपीला काल १२ ऑगस्टला बेळगाव येथून वेंगुर्ला पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली. तसेच त्याच्या ताब्यातून त्याने फसवणूक करून घेतलेला सर्व मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विनायक केसरकर करीत आहेत.