चेंबूरच्या ‘त्या’ स्पा रेड दरम्यान नेमके घडले तरी काय?; सुटका केलेल्या थेरेपिस्टची पोलिसांत धाव
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2025 07:52 IST2025-11-27T07:52:21+5:302025-11-27T07:52:45+5:30
गेल्या महिन्यात २७ ऑक्टोबर रोजी चेंबूरच्या युवान थाई स्पावर पीटा अंतर्गत कारवाई करण्यात आली होती. या कारवाईत ग्राहक, मॅनेजर तसेच कर्मचाऱ्यांवर कारवाई करत थायलंडच्या तरुणींसह महिलांना ताब्यात घेतले.

चेंबूरच्या ‘त्या’ स्पा रेड दरम्यान नेमके घडले तरी काय?; सुटका केलेल्या थेरेपिस्टची पोलिसांत धाव
मुंबई - चेंबूरच्या युवान स्पावर गेल्या महिन्यात आरसीएफ पोलिसांनी सेक्स रॅकेटप्रकरणी ८ थायलंडच्या तरुणींसह महिलांची सुटका केली. मात्र, त्यांपैकी एका तरुणीने महिनाभराने पोलिसांत धाव घेत कारवाईसाठी पाठवलेल्या बोगस ग्राहकाकडून जबरदस्ती केल्याचा आरोप केल्याने खळबळ उडाली आहे. मुलीच्या तक्रारीवरून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
गेल्या महिन्यात २७ ऑक्टोबर रोजी चेंबूरच्या युवान थाई स्पावर पीटा अंतर्गत कारवाई करण्यात आली होती. या कारवाईत ग्राहक, मॅनेजर तसेच कर्मचाऱ्यांवर कारवाई करत थायलंडच्या तरुणींसह महिलांना ताब्यात घेतले. त्यानंतर सुधारगृहात पाठवण्यात आले. महिनाभराने या रेडमधील ३८ वर्षीय स्पा थेरेपीस्टने २४ तारखेला सांताक्रूझ पोलिस ठाण्यात धाव घेतली. थेरेपीस्टच्या तक्रारीनुसार, सायंकाळी पावणे सहा वाजता एक तासासाठी डीप टिश्यू स्पा थेरेपी बुक केली. ठरल्याप्रमाणे संबंधित व्यक्तीने बुक केलेल्या थेरपीची माहिती देऊन, मसाज देत असताना त्याने अश्लील स्पर्श करण्यास सुरुवात केली. त्याला विरोध करताच, त्याने धमकाविण्यास सुरुवात केली. तसेच मी पॉवरफुल व्यक्ती असून पोलिसांचा खास असल्याचे सांगून खोट्या केसमध्ये अडकवण्याची भीती घातली.
झीरो एफआयआर
संबंधित ग्राहकासोबत शारीरिक संबंधाला नकार दिला. मात्र, इथे सेक्स रॅकेट सुरू असल्याचे माहिती असल्याचे सांगून जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. त्याने विवस्त्र केले. त्यानंतर, तीन अनोळखी व्यक्ती खोलीत आले. त्यांनी, नग्न अवस्थेमधील फोटो व व्हिडीओ काढले. त्यानंतर संबंधित व्यक्ती आणि अन्य तीन साथीदार निघून गेल्याचा आरोप केला. त्यानुसार, सांताक्रूझ पोलिसांनी त्यांच्या जबाबावरून झिरो एफआयआर नोंदवत चौकशी सुरू केली आहे.
महिलेचा न्यायाधीशांसमोर जबाब
आरसीएफ पोलिसांनी कारवाईसाठी याच व्यक्तीला ग्राहक म्हणून पाठवले होते. याप्रकरणी महिलेच्या तक्रारीवरून चौकशी सुरू असल्याने याबाबत अधिकाऱ्याने काहीही माहिती देण्यास टाळले.एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, संबंधित तक्रारदार महिलेची स्पा कारवाईदरम्यान सुटका केल्यानंतर न्यायाधीशांसमोर हजर करत जबाब नोंदविण्यात आला आहे. नियमांप्रमाणे मेडिकल चाचणी देखील करण्यात आली आहे. त्यादरम्यान कोणीही काही तक्रार का केली नाही? हे कुठेतरी खोटा आरोप करत मालकाला वाचविण्याचा प्रयत्न करत असून याबाबत सखोल तपास करण्यात येईल, असे सांगितले.