पानाच्या टपरीवर अवघ्या ४० रुपयांवरून वाद चिघळला; भर लग्नाच्या मंडपात शिरून दोघांनी हंगामा केला!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2025 12:12 IST2025-12-03T12:10:11+5:302025-12-03T12:12:22+5:30
एका विवाह सोहळ्याच्या रिसेप्शन पार्टीत आलेल्या काही तरुणांचा पान टपरीवाल्याशी केवळ ४० रुपयांच्या पेमेंटवरून वाद झाला अन्..

AI Generated Image
मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये एका विवाह सोहळ्याच्या रिसेप्शन पार्टीत आलेल्या काही तरुणांचा पान टपरीवाल्याशी केवळ ४० रुपयांच्या पेमेंटवरून वाद झाला. या किरकोळ वादाने लगेचच हिंसक रूप धारण केले. पान टपरीवाला आणि त्याच्या साथीदारांनी थेट मॅरेज हॉलमध्ये घुसून दोन तरुणांना बेदम मारहाण केली. या हल्ल्यात एका तरुणाच्या डोक्याला तीन टाके पडले आहेत, तर दुसऱ्यालाही दुखापत झाली आहे. या संपूर्ण गोंधळामुळे रिसेप्शन कार्यक्रमात एकच गोंधळ उडाला होता.
नेमकं काय घडलं?
भोपाळमधील व्हीआयपी रोडवरील खानूगावच्या बाग-ओ-बहार मॅरेज हॉलमध्ये सोमवारी रात्री उशिरा रिसेप्शन पार्टी सुरू होती. रात्री साधारण १२ वाजता दोन तरुणांनी मॅरेज हॉलबाहेरील मोहसीन नावाच्या पान टपरीवाल्याच्या दुकानातून ४० रुपयांचे सामान खरेदी केले. मोहसीनने पैसे मागितल्यावर तरुणांनी ऑनलाइन पेमेंट करण्याची तयारी दर्शवली, पण मोहसीनने त्याला नकार देत रोख रक्कम देण्याचा आग्रह धरला. याच गोष्टीवरून दोघांमध्ये बाचाबाची झाली.
पैसे न देता परतणाऱ्या तरुणांवर हल्ला
वाद वाढत असताना, ते तरुण पैसे न देताच मॅरेज हॉलमध्ये परत जाऊ लागले. यामुळे संतापलेल्या दुकानदाराने त्वरित आपल्या घरातील आणि परिसरातील लोकांना बोलावून घेतले. थोड्याच वेळात, पान टपरीवाल्याचे अनेक साथीदार मॅरेज हॉलबाहेर जमा झाले. त्यांनी थेट रिसेप्शन पार्टीत घुसून त्या दोन्ही तरुणांना अमानुषपणे मारहाण केली. इतकेच नाही, तर जमावाने दगडफेकही केली, ज्यामुळे कार्यक्रमात काही काळ अफरातफरीची परिस्थिती निर्माण झाली.
पोलिसांनी ५ आरोपींना केली अटक
या हल्ल्यात दोन्ही तरुण जखमी झाले असून, एका तरुणाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे तीन टाके घालावे लागले आहेत. त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच कोहेफिजा पोलिस स्टेशनचे कर्मचारी तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारावर ९ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. यापैकी पोलिसांनी ५ आरोपींना अटक करून त्यांना तुरुंगात पाठवले आहे. उर्वरित आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत.