'शबनम कांड' सारखंच प्रकरण! 'सावधान इंडिया' पाहिलं अन् फिल्मी स्टाईलनं मित्राला संपवलं; त्या तिघांमध्ये नेमकं काय झालं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2025 11:11 IST2025-09-26T11:08:51+5:302025-09-26T11:11:34+5:30
'क्राइम पेट्रोल' आणि 'सावधान इंडिया'सारख्या गुन्हेगारीवर आधारित मालिका पाहून आरोपींनी एका निष्पाप तरुणाlला संपवले.

AI Generated Image
उत्तर प्रदेशातील मुरादाबादमध्ये नुकत्याच झालेल्या योगेश हत्याकांडाने संपूर्ण परिसराला हादरवून सोडले होते. पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावला असून, यामागे प्रेयसी, तिचा प्रियकर आणि साथीदार यांचा भयानक कट असल्याचे उघड झाले आहे. 'क्राइम पेट्रोल' आणि 'सावधान इंडिया'सारख्या गुन्हेगारीवर आधारित मालिका पाहून आरोपींनी एका निष्पाप तरुणाची हत्या केली आणि प्रेयसीच्या कुटुंबीयांना फसवण्याचा कट रचला होता. या घटनेमुळे पुन्हा एकदा शबनम प्रकरणाच्या क्रूरतेची आठवण झाली आहे.
प्रेयसीसाठी मित्राला संपवले!
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकबडा येथील स्वाती हिचे मनोज नावाच्या तरुणासोबत प्रेमसंबंध होते. स्वातीच्या कुटुंबीयांकडून त्यांच्या प्रेमाला विरोध होत होता. यामुळे स्वातीने मनोजवर कुटुंबीयांना रस्त्यातून हटवण्यासाठी दबाव टाकला. यानंतर मनोजने टीव्हीवरील गुन्हेगारी मालिका पाहून एक भयंकर योजना आखली. त्याने विचार केला की, दुसऱ्या कोणाची तरी हत्या करून, त्याचे खापर स्वातीच्या वडील आणि भावांवर फोडता येईल.
क्राईम सिरीयल पाहून शिकले हत्या करण्याची पद्धत
पोलिसांच्या चौकशीत उघड झाले की, आरोपी मनोज नियमितपणे 'सावधान इंडिया' आणि 'क्राइम पेट्रोल' यांसारख्या मालिका पाहायचा. या मालिकांमधूनच त्याने हत्या करण्याचे गुन्हेगारी तंत्र शिकले. योजनेनुसार, मनोजने त्याचा मित्र योगेश याला दारू पाजली आणि त्याला एका निर्मनुष्य ठिकाणी घेऊन गेला. तिथे त्याने आधी योगेशचा मोबाईल हिसकावून घेतला, जेणेकरून पोलिसांना कोणताही पुरावा मिळणार नाही. त्यानंतर गळा दाबून आणि विटेने डोके ठेचून त्याने योगेशची निर्घृण हत्या केली आणि मृतदेह झुडपांमध्ये फेकून दिला.
पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न
हत्या केल्यानंतर मनोज शांत बसला नाही. त्याने योगेशच्याच फोनमधून ११२ या आपत्कालीन क्रमांकावर कॉल केला. आवाज बदलून त्याने पोलिसांना सांगितले की, "मला स्वातीचे वडील आणि भाऊ मारत आहेत." अशा प्रकारे निष्पाप लोकांना हत्येच्या गुन्ह्यात अडकवण्याचा त्याचा डाव होता. पण, पोलिसांनी जेव्हा कॉल डिटेल्स रेकॉर्ड आणि इतर तांत्रिक पुराव्यांची तपासणी केली, तेव्हा सत्य बाहेर आले.
तीघे आरोपी गजाआड
पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी आरोपी मनोज आणि त्याच्या साथीदारांना पकडण्यासाठी सापळा रचला. स्वतःला पोलिसांच्या वेढ्यात पाहून मनोजने पोलिसांवर गोळीबार केला. या दरम्यान केलेल्या जवाबी कारवाईत मनोजच्या पायाला गोळी लागली आणि तो जखमी होऊन खाली पडला. पोलिसांनी घटनास्थळावरून त्याचा साथीदार मनजीत यालाही पकडले. मनोज, मनजीत आणि प्रेयसी स्वाती या तिघांनाही पोलिसांनी अटक करून तुरुंगात पाठवले आहे.
पोलिसांनी घटनास्थळावरून ३१५ बोअरचा कट्टा, काडतुसे, मोटरसायकल आणि मोबाईल जप्त केला आहे. एसएसपी सतपाल अंतिल यांनी माहिती दिली की, आरोपी मनोजवर यापूर्वीच लूट आणि हत्येचा प्रयत्न यांसारखे अर्धा डझनाहून अधिक गुन्हे दाखल आहेत. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.