महसुल विभागाने जप्त केलेले वाळूचे ९ ट्रक चोरीला
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2018 16:30 IST2018-10-02T16:18:54+5:302018-10-02T16:30:19+5:30
हवेली तहसील कार्यालयामार्फत सोलापूर रोडवर बेकायदा वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रकला अडवून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली होती़.

महसुल विभागाने जप्त केलेले वाळूचे ९ ट्रक चोरीला
पुणे : महसुल विभागाने कारवाई करुन जप्त केलेले वाळूचे ९ ट्रक चोरुन नेण्याचा प्रकार उघडकीस आला आहे़. विशेष म्हणजे त्यात सोलापूर आणि अहमदनगर जिल्ह्यातील ट्रकचा समावेश आहेत़. याप्रकरणी हवेली तहसील कार्यालयातील मंडल अधिकारी तेजस्विनी मंगेश साळवेकर (वय ३९, रा़ ग्रीन व्हॅली, बावधन) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे़.
याबाबत पोलिसांनी सांगितल्यानुसार, हवेली तहसील कार्यालयामार्फत सोलापूर रोडवर बेकायदा वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रकला अडवून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली होती़. सोमवारी १ आॅक्टोंबरला तेजस्विनी साळवेकर यांच्या नेतृत्वाखाली या वाळूच्या ट्रकवर कारवाई करण्यात येत होती़. त्यांनी दुपारी साडेतीन वाजता शेवाळवाडी येथे यातील ९ ट्रकवर कारवाई करुन ते ताब्यात घेतले व एका ठिकाणी ते उभे करण्यास सांगण्यात आले़ त्यांच्यावर कारवाई करुन ती शेवाळवाडी येथे एका ठिकाणी ठेवण्यात आले होते़. त्यानंतर सायंकाळी आणखी काही ट्रक वाळू वाहतूक करीत असल्याचे समजल्यावर हवेली महसुलचे कर्मचारी सोलापूर रोडवर आले असताना या सर्वांनी हे ट्रक घेऊन कर्मचाऱ्यांना गुंगारा देत ४८ लाख १८ हजार ६०० रुपयांचे ९ ट्रक चोरुन नेल्याची फिर्याद देण्यात आली आहे़.
या ९ ट्रकपैकी ५ ट्रक पुण्यातील असून अहमदनगर, सोलापूर, पिंपरी चिंचवड, बारामती येथे अन्य ४ ट्रकची नोंदणी करण्यात आली आहे़. अहमदनगर, सोलापूरमधील ट्रक पुण्यात बेकायदा वाळू वाहतूक करीत असल्याचे दिसून आले आहे़. हडपसर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक विजय झंझाड अधिक तपास करत आहेत़.