Digital Arrest: आतंकवाद्यांनी बँक खाते वापरल्याचे सांगितले, साताऱ्यातील ८० वर्षांच्या आजोबांचे पाच लाख उकळले
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2025 13:52 IST2025-10-15T13:50:53+5:302025-10-15T13:52:23+5:30
व्हॉट्सॲपवर कोर्टाचा शिक्का मारल्याचे लेटर पाठवले, सायबर चोरट्यांकडून वयोवृद्ध लक्ष्य

Digital Arrest: आतंकवाद्यांनी बँक खाते वापरल्याचे सांगितले, साताऱ्यातील ८० वर्षांच्या आजोबांचे पाच लाख उकळले
सातारा: सेवानिवृत्त पोलिसाला डिजिटल अरेस्ट केल्याची घटना ताजी असतानाच आता आणखी एका ८० वर्षांच्या आजोबांना डिजिटल अरेस्ट करून सायबर चोरट्यांनी त्यांच्याकडून पाच लाख रुपये उकळले. आतंकवाद्यांनी तुमचे बँक खाते वापरल्याचे सांगून संबंधित आजोबांना भीती दाखवल्याचे समोर आले आहे.
याबाबत सायबर पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, साताऱ्यामध्ये ८० वर्षांचे आजोबा एकटेच राहात आहेत. त्यांचा मुलगा व इतर कुटुंबीय मुंबई येथे वास्तव्यास आहेत. आजोबा खासगी कंपनीतून सेवानिवृत्त झाले आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांच्या मोबाइलवर एक फोन आला. ‘तुमचे बँक खाते आतंकवाद्यांनी वापरले आहे. आम्ही मुंबई कुलाबा पोलिस ठाण्यातून सीआयडीचे अधिकारी बोलत आहोत,’ असे सांगितले. या प्रकारामुळे आजोबा भयभीत झाले.
‘तुम्हाला आता आम्ही डिजिटल अरेस्ट करत आहोत. जोपर्यंत कागदपत्रांची शहानिशा होत नाही. तोपर्यंत हा प्रकार तुम्ही काेणाला सांगू नका,’ अशीही त्यांना धमकी देण्यात आली. त्यामुळे त्यांनी डिजिटल अरेस्टची माहिती त्यांच्या मुलाला दिली नाही. त्यांच्या व्हॉट्सॲपवर कोर्टाचा शिक्का मारल्याचे लेटर पाठवले. त्यामुळे आजोबांना आपण खरोखरच अरेस्ट झालो आहोत, याची खात्री पटली. ‘तुमच्यावर आमचा वाॅच सुरू झाला आहे. आता तुम्ही डिपाॅझिट म्हणून पैसे पाठवा. तुम्ही निर्दोष सिद्ध झाल्यानंतर तुम्हाला काही दिवसांत तुमचे पैसे परत दिले जातील,’ असेही त्यांना सांगण्यात आले.
यानंतर आजोबांनी सायबर चोरट्यांना गुगलपेवर तब्बल ५ लाख रुपये पाठविले. त्यानंतर संबंधित सायबर चोरट्यांनी त्यांच्याशी संपर्क बंद केला. ही घटना घडून महिना उलटला तरी पैसे परत येत नसल्याचे पाहून आजोबांनी हा सारा प्रकार त्यांच्या मुलाला सांगितला. त्यानंतर मुलाने सातारा सायबर पोलिस ठाण्यात धाव घेऊन वडिलांना केलेल्या डिजिटल अरेस्टची माहिती दिली. सायबर पोलिस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.
सायबर चोरट्यांकडून वयोवृद्ध लक्ष्य
महिनाभरापूर्वी साताऱ्यात सेवानिवृत्त पोलिसाला डिजिटल अरेस्ट करून पाच लाख रुपये उकळले होते. त्यानंतर पुन्हा ही घटना घडल्याने साताऱ्यातील वयोवृद्ध लोक सायबर चोरट्यांनी आपले लक्ष्य बनविल्याचे समोर येत आहे.