५ पोलिसांचं निलंबन; गुन्हेगाराचा वाढदिवस साजरा करणं पडलं महागात
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2019 14:18 IST2019-07-31T14:14:18+5:302019-07-31T14:18:18+5:30
पोलीस ठाण्यात साजरा झाला गुन्हेगाराचा वाढदिवस

५ पोलिसांचं निलंबन; गुन्हेगाराचा वाढदिवस साजरा करणं पडलं महागात
मुंबई - भांडुपमध्ये वाढत्या गुन्हेगारीला नियंत्रणात आणण्याचे आव्हान कायम असताना भांडुप पोलीस ठाण्यात गुंडाचा वाढदिवस साजरा केल्याच्या व्हिडीओने पोलिसांवर टीकेची झोड उठली. त्यामुळे भांडुपकरांमध्येही नाराजीचे वातावरण होते. या प्रकरणी संबंधित पोलिसांची खातेनिहाय चौकशीदरम्यान भांडुप पोलीस ठाण्याच्या ५ पोलिसांचं निलंबन करण्यात आलं आहे. निलंबित पोलिसांची नावे पोलीस उपनिरीक्षक सचिन कोकरे आणि पंकज शेवाळे तर हेड कॉन्स्टेबल सुभाष घोसाळकर, पोलीस नाईक अनिल गायकवाड आणि पोलीस कॉन्स्टेबल मारुती जुमदे अशी आहेत ही माहिती सहपोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी दिली.
गेल्या आठवड्यात सोनापूर येथील रहिवासी असलेल्या आयान खान उर्फ उल्ला या गुंडाचा वाढदिवस पोलीस ठाण्याच्या चौथ्या मजल्यावरील एका खोलीत साजरा करण्यात आला. पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांना केक भरवताना, गळाभेट देत शुभेच्छा देतानाचे व्हिडीओ, फोटो उल्लानेच व्हॉट्सअॅप स्टेट्सला ठेवले. पुढे तेच व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आणि पोलिसांवर टीका सुरू झाली. त्याच्याविरुद्ध खंडणी, मारहाणीचे गुन्हे दाखल आहेत. त्यातील एका प्रकरणात आरोपपत्रही दाखल झालेले नाही. उल्ला हा काही पोलिसांसाठी हप्ते गोळा करण्याचे काम करतो, अशी चर्चाही भांडुपमध्ये आहे. हे प्रकरण सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळे पोलिसांकड़ून संबंधित पोलिसांची अखेर खातेनिहाय चौकशी सुरू करण्यात आली होती.
मुंबई : भांडुप पोलीस ठाण्यात गुन्हेगारांचा वाढदिवस साजरा करणे पडले महागात, पाच पोलिसांचे निलंबन, दोन अधिकाऱ्यांसह 3 अंमलदारांचा समावेश @mumbaipolicehttps://t.co/CbvSFUjpi9
— Lokmat (@MiLOKMAT) July 31, 2019