६० वर्षांच्या गर्लफ्रेंडच्या हट्टाला कंटाळला ४५ वर्षांचा बॉयफ्रेंड; भेटायला बोलावलं अन् सगळंच संपवलं!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2025 13:58 IST2025-11-24T13:57:07+5:302025-11-24T13:58:13+5:30
६० वर्षीय गर्लफ्रेंडने वारंवार केलेल्या एकाच मागणीला कंटाळून एका ४५ वर्षीय प्रियकराने तिला संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

AI Generated Image
प्रेमसंबंधातून झालेल्या एका हत्येच्या घटनेने उत्तर प्रदेशातील हाथरस जिल्हा हादरला आहे. आपल्या ६० वर्षीय गर्लफ्रेंडने वारंवार केलेल्या एकाच मागणीला कंटाळून एका ४५ वर्षीय प्रियकराने तिचा गळा दाबून खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या खूनी प्रेमप्रकरणात पोलिसांनी आरोपी प्रियकराला अटक केली असून, पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.
रस्त्यावर आढळला मृतदेह
१४ नोव्हेंबर रोजी हाथरसच्या चंदपा क्षेत्रातील नगला भुस तिठ्याजवळ रस्त्याच्या कडेला एका ६० वर्षीय अज्ञात महिलेचा मृतदेह पोलिसांना आढळला. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली. मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी आणि आरोपीला अटक करण्यासाठी पोलिसांनी तब्बल १० विशेष पथके तयार केली होती.
पोलिस अधीक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी पाच जिल्ह्यांतील सुमारे एक हजार सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले. या तपासानंतर आग्रा येथील ताजगंज भागात राहणाऱ्या ४५ वर्षीय इमरान नावाच्या व्यक्तीवर संशय बळावला. पोलिसांनी रविवारी हाथरसमध्ये हतीसा पुलाजवळून इमरानला अटक केली. त्याच्याकडून मृत महिलेचा फोनही जप्त करण्यात आला आहे.
लेकीच्या लग्नात झाली भेट आणि...
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोलकाता येथे राहणाऱ्या मृत महिला जोशीना यांच्या मुलीचे लग्न आग्रा येथील सत्तार नावाच्या तरुणाशी झाले होते. इमरानच्या सासरवाडीचा परिसर आणि जोशीना यांचे माहेरजवळच असल्याने इमरान आणि जोशीना यांची वारंवार भेट होत होती. याच भेटीतून दोघांमध्ये प्रेमसंबंध सुरू झाले होते. १० नोव्हेंबर रोजी सत्तार आणि मुमताज यांचे लग्न होते. या लग्नासाठी जोशीना कोलकाताहून आग्रा येथे आल्या होत्या.
एकाच मागणीमुळे संतापला प्रियकर!
लग्नानंतर जोशीना यांनी इमरानच्या घरी जाऊन त्याच्यावर लग्न करण्यासाठी दबाव आणायला सुरुवात केली. जोशीना यांचा वारंवारचा हट्ट इमरानला असह्य झाला होता. मात्र, इमरानला त्याची बायको आणि मुलं असल्यामुळे दुसरे लग्न करायचे नव्हते. या मागणीमुळे तो प्रचंड तणावाखाली होता. तपासादरम्यान इमरानने पोलिसांना सांगितले की, १३ नोव्हेंबर रोजी तो जोशीनाला कोलकाता येथे सोडण्याच्या बहाण्याने आग्रा येथून बसने निघाला. पण तो पश्चिम बंगालला न जाता आग्रा येथे परतण्यासाठी सोहराब गेट डेपोच्या बसमध्ये चढला. वाटेत दोघे हाथरसमध्ये नगला भुस तिठ्यावर उतरले.
गळा दाबून संपवलं!
लग्नासाठी दबाव टाकणाऱ्या जोशीना यांच्यापासून कायमची सुटका मिळवण्यासाठी इमरानने त्याच निर्जन रस्त्यावर जोशीना यांचा गळा दाबून खून केला आणि घटनास्थळावरून पळ काढला. सध्या पोलिसांनी इमरानविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला असून, त्याला न्यायालयात हजर करण्याची प्रक्रिया सुरू आहे. अवैध संबंध आणि लग्नाच्या मागणीमुळे झालेल्या या हत्याकांडाने परिसरात मोठी खळबळ उडवून दिली आहे.