बनावट दस्तऐजव तयार करुन फायनान्स कंपनीला ३२ लाखांना गंडा
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2020 20:21 IST2020-06-24T20:16:44+5:302020-06-24T20:21:57+5:30
आपल्या मालकीच्या जमिनीवर बनावट कागदपत्रांच्या आधारे कर्ज घेतल्याचा प्रकार उघडकीस आल्यावर तक्रार दाखल...

बनावट दस्तऐजव तयार करुन फायनान्स कंपनीला ३२ लाखांना गंडा
पुणे : जमिनीचे खोटे दस्तऐवज तयार करुन त्या आधारे जमीन खरेदी करण्याचा बहाणा करुन कर्ज घेऊन फायनान्स कंपनीला ३२ लाख ६२ हजार रुपयांचा गंडा घालण्यात आला.
याप्रकरणी जमिनीच्या मुळ मालकाने केलेल्या तक्रारीनुसार एका महिलेसह ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी संतोष पिसाळ (वय ४३, रा.आदर्शनगर, हडपसर) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार शिवाजी प्रभाकर स्वामी (वय ३८, रा. सोरतापवाडी), अमोल दीपक चौधरी (वय ३२, रा. सोरतापवाडी), अजय गुलाब गायकवाड (वय ३५, रा. कुंजीरवाडी), संजय कचरु पटेकर (वय ४०) व आणखी दोघे अशा ६ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिसाळ यांच्या मालकीची फुरसुंगीत जागा आहे. ही जागा आरोपींनी खोटी कागदपत्रे आणि दस्तऐवज तयार करुन प्रथम कपिल झुंबरलाल सरवदे यांना विकली. त्यानंतर तीच जागा पिसाळ यांच्या जागी दुसरीच व्यक्ती उभी करुन संजय पटेकर यांना विकली. या खोट्या कागदपत्रांच्या आधारे त्यांनी आनंद फायनान्स या कंपनीकडून ३२ लाख ६२ हजार रुपयांचे कर्ज घेतले.आपल्या मालकीच्या जमिनीवर बनावट कागदपत्रे तयार करुन कर्ज घेतल्याचा प्रकार लक्षात आल्यावर पिसाळ यांनी पोलिसांकडे तक्रार दिली होती. त्याची शहानिशा केल्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलीस निरीक्षक दिलीप गाडे अधिक तपास करीत आहेत.