३० वर्षांची विवाहिता आणि २६ वर्षांचा प्रियकर; जळगावात 'त्या' एका नकाराने गेला दोघांचा जीव
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2026 19:06 IST2026-03-02T19:04:29+5:302026-03-02T19:06:50+5:30
इन्स्टाग्रामवरील प्रेमाचा रक्तरंजित शेवट; विवाहितेची हत्या करून प्रियकराने स्वतःला संपवले

३० वर्षांची विवाहिता आणि २६ वर्षांचा प्रियकर; जळगावात 'त्या' एका नकाराने गेला दोघांचा जीव
Chopda Murder Case: सोशल मीडियाच्या जगातील आकर्षणातून निर्माण झालेली नाती कधीकधी किती भयानक वळण घेऊ शकतात, याची प्रचिती जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यात आला. अकुलखेडा गावात इंस्टाग्रामवर सुरू झालेल्या एका प्रेमप्रकरणाचा अंत दुहेरी हत्याकांडाने झाला. एका ३० वर्षीय विवाहितेची गोळ्या झाडून हत्या केल्यानंतर प्रियकराने स्वतःचेही जीवन संपवले आहे. या धक्कादायक घटनेमुळे संपूर्ण जळगाव जिल्हा हादरून गेला आहे.
शाळेतून परतलेल्या लेकीला बसला मोठा धक्का
नेहमीप्रमाणे शनिवारी सकाळी अकुलखेडा येथील पाटील कुटुंबातील चिमुकली शाळेत गेली होती. सकाळी १०:३० च्या सुमारास ती घरी परतली. मात्र घराचा दरवाजा उघडताच तिच्यासमोर जे दृश्य होते, त्याने तिच्या पायाखालची जमीनच सरकली. समोर तिची आई आणि एक अनोळखी तरुण रक्ताच्या थारोळ्यात पडलेले होते. आईला अशा अवस्थेत पाहून मुलीला जबर धक्का बसला. त्यानंतर शेजाऱ्यांनी घराकडे धाव घेतली.
इंस्टाग्रामवर जुळलं सूत अन् ५ वर्षांचा संसार विखुरला
पोलीस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, शिरपूर येथील रहिवासी देवा सुरेश धनगर (२६) आणि विवाहितेची ओळख काही वर्षांपूर्वी इंस्टाग्रामच्या माध्यमातून झाली होती. ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले आणि ही प्रेमगाथा तब्बल पाच वर्षे सुरू होती. विवाहितेला दोन मुले होती, तर देवा हा देखील विवाहित होता. या नात्यामुळे देवाच्या पत्नीने त्याला सोडून दिले होते, तरीही तो महिलेच्या प्रेमात बुडालेला होता.
दुरावा ठरला मृत्यूचे कारण
गेल्या काही दिवसांपासून या नात्यात मिठाचा खडा पडला होता. विवाहितेने देवाशी बोलणे टाळण्यास सुरुवात केली होती. तो वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होता, मात्र विवाहिता प्रतिसाद देत नव्हती. याच रागातून देवाच्या डोक्यात सूडाची भावना निर्माण झाली. शनिवारी सकाळी तो आपली दुचाकी घेऊन थेट अकुलखेडा येथे विवाहितेच्या घरी पोहोचला. तिथे पुन्हा वाद झाला आणि संतापाच्या भरात देवाने आपल्यासोबत आणलेल्या गावठी पिस्तूलमधून विवाहितेच्या डोक्यात गोळी झाडली. त्यानंतर त्याने त्याच पिस्तूलने स्वतःवरही गोळी झाडून घेतली.
घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी ताफ्यासह घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळावरून देवा धनगर याची दुचाकी आणि गावठी पिस्तूल जप्त केले आहे. विवाहितेच्या पतीने दिलेल्या फिर्यादीवरून खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.