एकाच गावातील ३ तरुणी एकत्र गायब, पण तिघींची कहाणी वेगवेगळी; २४ तासांत पोलिसांनी काढले शोधून!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2025 12:58 IST2025-11-26T12:57:32+5:302025-11-26T12:58:48+5:30
एकाच वयोगटातील आणि एकाच गावातील तीन तरुणी अचानक रहस्यमय पद्धतीने गायब झाल्या होत्या.

AI Generated Image
बिजनौर जिल्ह्यातील नजीबाबाद परिसरातून अचानक बेपत्ता झालेल्या महावतपूर बिल्लौच गावातील तीन १९ ते २० वर्षीय तरुणींना पोलिसांनी अवघ्या २४ तासांत दिल्लीतून सुखरूप शोधून काढले आहे. तांत्रिक तपास, कॉल डिटेल्स, लोकेशन ट्रॅकिंग आणि पोलिसांच्या जलद कारवाईमुळे हे शक्य झाले. मात्र, या तिघींनीही घर सोडण्यामागे दिलेली कारणे ऐकून पोलीस अधिकारीही काही काळ विचारमग्न झाले होते; कारण या तिघींच्या समस्या आणि कहाण्या पूर्णपणे वेगळ्या होत्या.
उत्तर प्रदेशच्या बिजनौरमधील महावतपुर बिल्लौच हे छोटेसे गाव गेल्या २४ तासांपासून एका गूढ घटनेमुळे चिंतेत होते. एकाच वयोगटातील आणि एकाच गावातील तीन तरुणी अचानक रहस्यमय पद्धतीने गायब झाल्या होत्या. पालकांनी शोध घेऊनही पत्ता न लागल्याने त्यांनी तातडीने पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस प्रशासनाने त्वरित तीन विशेष पथके तयार करून तपास सुरू केला. आणि याच तपासात पोलीस अधिकाऱ्यांना एक धक्कादायक सत्य समोर आले.
दोघींच्या कहाणीत मैत्री आणि ताण
पोलीस क्षेत्राधिकारी नितेश प्रताप सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, बेपत्ता झालेल्या तीन तरुणींपैकी दोन तरुणी खूप चांगल्या आणि जवळच्या मैत्रिणी होत्या. मात्र, त्यांच्या कुटुंबाला त्यांची ही मैत्री मान्य नव्हती. कुटुंबातील लोक वारंवार या दोघींना टोकत असत आणि त्यांच्या मैत्रीवर आक्षेप घेत त्यांना दूर राहण्याचा सल्ला देत.
नोकरीच्या शोधात होत्या दोघी
या सततच्या टोमण्यांना आणि मानसिक दबावाला कंटाळून दोघींनीही घर सोडण्याचा निर्णय घेतला. बाहेर जाऊन चांगली नोकरी शोधायची आणि स्वतंत्र आयुष्य जगायचे, या विचाराने त्या कोणालाही न सांगता चुपचाप घरातून निघून गेल्या होत्या.
तिसऱ्या तरुणीच्या पलायनामागे 'जबरदस्तीचे लग्न'
याच गावातील तिसऱ्या तरुणीची कहानी पूर्णपणे वेगळी होती. या तरुणीचे लग्न तिच्या इच्छेविरुद्ध कुटुंबाने ६ डिसेंबर रोजी ठरवून टाकले होते. लग्नाच्या अचानक सुरू झालेल्या तयारीमुळे आणि तिच्या मताला किंमत न दिल्याने ती मानसिकरित्या खूप तणावाखाली होती. तिने विरोध करूनही कुटुंबाच्या भूमिकेत कोणताही बदल झाला नाही. अखेर, जबरदस्तीने होणाऱ्या या लग्नाला कंटाळून तिनेही घर सोडण्याचा निर्णय घेतला.
एकाच गावात, पण समस्या वेगवेगळ्या
या तीनही तरुणी एकाच गावच्या असल्याने त्यांना एकमेकींच्या समस्यांची कल्पना होती. मानसिक ताण, कुटुंबाचा विरोध आणि वैयक्तिक स्वातंत्र्याची आस यामुळे त्या तिघींनीही एकत्र घर सोडण्याचा धाडसी निर्णय घेतला.
पोलिसांची जलद कारवाई, २४ तासांत मुली सापडल्या
बिजनौर पोलिसांनी तांत्रिक माहितीचा आधार घेत, कॉल डिटेल्स आणि मोबाईल लोकेशनचा कसून मागोवा घेतला. तपासासाठी तयार केलेल्या तीनही पथकांनी अत्यंत वेगाने समन्वय साधून काम केले. या जलद तपासामुळे अवघ्या २४ तासांत दिल्लीमध्ये तिन्ही तरुणींचे लोकेशन ट्रेस करण्यात पोलिसांना यश आले.
पोलिसांनी तिघींनाही सुखरूप ताब्यात घेतले असून, त्यांच्या कुटुंबियांना याची माहिती दिली आहे. तीनही मुली सुखरूप परतल्याने पालकांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे. तर, बिजनौर पोलिसांच्या या तत्पर कारवाईबद्दल गावामध्येही समाधान व्यक्त होत आहे.