पुण्यात दिवसाढवळ्या चोरट्यांनी मारला '' स्टेट बँक ऑफ इंडिया '' वर डल्ला ; २८ लाखांची रोकड लुटली
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2019 19:53 IST2019-02-22T17:09:58+5:302019-02-22T19:53:11+5:30
पुण्यातल्या स्वारगेट जवळील सेव्हन लव्ह चौकात चोरट्यांनी भरदिवसा स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएमवर डल्ला मारला.

पुण्यात दिवसाढवळ्या चोरट्यांनी मारला '' स्टेट बँक ऑफ इंडिया '' वर डल्ला ; २८ लाखांची रोकड लुटली
पुणे: पुणे: शहरातील सेव्हन लव्हज चौकात असणा-या स्टेट बँकेच्या टिंबर मार्केट शाखेतून भरदिवसा २८ लाखांची चोरी झाली. या घटनेमुळे नागरिकांमध्ये घबराट व खळबळ उडाली आहे.  एका चोरट्यांच्या टोळीने बँक कर्मचा-यांची नजर चुकवून कॅशिअरच्या मागे  ठेवलेली पैशांची पेटीच उचलून नेली.  तपासाकरिता स्थानिक पोलीस स्टेशन व गुन्हे शाखेची पथके आरोपींच्या मागावर धाडण्यात आली आहेत.  चोरी करणारी टोळी बँकेच्या सीसीटीव्हीत कैद झाली आहे. आरोपींनी पेटीतील पैसे काढून घेऊन ती टिळक रस्त्यावर टाकून दिल्याची माहिती मिळाली आहे.
याप्रकरणी बँकेच्यावतीने वर्तिका प्रांशु श्रीवास्तव (35,रा.हडपसर) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानूसार अनोळखी व्यक्तीविरुध्द खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी सव्वाअकराच्या सुमारास चोरीची घटना घडली. स्टेट बँकेच्या शाखेत सात ते आठ व्यक्ती एका मागोमाग शिरल्या. त्यांनी कॅशीयरसह इतर काऊंटरवरील व्यक्तिंना बोलण्यात गुंतवून ठेवले. यानंतर कॅशीयरच्या मागे पैशांनी भरलेली पेटी उचलून एक व्यक्ती बाहेर पडला. यानंतर त्याचे इतर साथीदारही एका मागोमाग बँकेतून निघून गेले. अन्य व्यक्तिंना पैसे देण्यासाठी कॅशीयर मागे वळल्यानंतर रोकड असलेली पेटी जागेवर नसल्याचे त्याच्या लक्षात आले. या पेटीमध्ये तब्बल 28 लाख रुपये असल्याची माहिती बँकेकडून देण्यात आली. घटनास्थळी पोलीस उपायुक्त परिमंडळ सुहास बावचे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी, पोलीस निरीक्षक संभाजी शिर्के, सहायक पोलीस निरीक्षक वैभव पवार, उमाजी राठोड आदींनी भेट दिली. 
............ 
एवढ्या मोठ्या प्रमाणात बँकेतून रक्कम चोरीला गेल्याचे कळताच तातडीने आरोपींच्या मागावर पथके रवाना करण्यात आली आहेत.  अज्ञात सात ते आठ व्यक्तींनी बँकेतील कर्मचा-यांना बोलण्यात गुंतवून ही चोरी केली आहे. प्रशासनाला या चोरीचे सीसीटीव्ही फुटेज मिळाले असून चोरांनी थोड्याच अंतरावर पैसे काढून रिकामी पेटी टाकून दिल्याचेही आढळले आहे.
- शिरीष देशपांडे, उपायुक्त, गुन्हे शाखा 
............................
 चोरीस गेलेल्या नोटांचा तपशील  
2000 दराच्या 486 नोटा, 500 दराच्या  नोटा, 200 दराच्या 531 नोटा, 100 दराच्या 1,666 नोटा, 1000 रुपयांची लोखंडी पेटी असा 28 लाख 9 हजार 300 रुपयांचा ऐवज चोरुन नेला.