22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2026 20:12 IST2026-04-09T20:08:55+5:302026-04-09T20:12:41+5:30
Boyfriend Killed Girlfriend in Delhi: १३ वर्षांनी मोठ्या असलेल्या गर्लफ्रेंडची बॉयफ्रेंडने हत्या केल्याची घटना समोर आली आहे. पीजी मालकाला शंका आल्यामुळे हत्येचे प्रकरण उजेडात आले.

22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
तो २२ वर्षांचा, तर गर्लफ्रेंड ३५ वर्षांची. ते दोघे मागील सात वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते. पण, दोघांमध्ये काय घडलं माहिती नाही. मंगळवारी म्हणजे ७ एप्रिल रोजी दोघे पीजी रुममध्ये गेले. तिथेच त्याने तिची गळा दाबून हत्या केली आणि मृतदेह बेड बॉक्समध्ये लपवला. पीजी मालकाच्या सतर्कतेमुळे हत्येची ही घटना समोर आली.
दिल्लीतील मंगोलपुरीमध्ये ही घटना घडली. पोलिसांनी सांगितले की, मयत तरुणी मंगोलपुरीतीलच आहे. तिची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. मृतदेह बघितल्यानंतर गळा दाबल्याच्या खुणा कपाळावर जखमा आढळून आल्या आहेत.
हात-पाय बांधले आणि तोंड दाबले
७ एप्रिल रोजी मंगोलपुरी पोलीस ठाण्यात एक कॉल आला. पीजी मालक अमरजीत यांनी हा कॉल केला होता. पत्थर मार्केट परिसरात असलेल्या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील पीजी मध्ये पोलीस पोहोचले.
पोलिसांनी आधी रुम खोलली. त्यानंतर तपासणी करण्यात आली. तेव्हा बेड बॉक्समध्ये तरुणीचा मृतदेह पडलेला होता.
पोलिसांनी सांगितले की आरोपीने आधी तरुणीचे हात आणि पाय बांधले. त्यानंतर कपड्याचा बोळा तिच्या तोंडात कोंबला आणि त्यानंतर गळा दाबला. तिचा मृत्यू झाल्यानंतर आरोपीने मृतदेह बेड बॉक्समध्ये टाकून दिला.
सात वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये
प्राथमिक तपासातून अशी माहिती समोर आली की, आरोपी आणि तरुणी मागील सात वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते. ७ एप्रिल रोजी सायंकाळी ४.३० वाजता आरोपी आणि तरुणी पीजीमध्ये आले होते. तिथे एक तास ते रुममध्ये होते.
बॉयफ्रेंडसह तिघांना अटक
एका तासानंतर आरोपी एकटाच बाहेर पडला, तेव्हा पीजी मालकाला शंका आली. त्याने लगेच पोलिसांना कॉल केला.
पोलिसांनी या प्रकरणात हत्येचा गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध सुरू केला. या प्रकरणात पोलिसांनी आरोपी बॉयफ्रेंडसह तिघांना अटक केली. सुरेंद्र उर्फ बॉबी, जोगिंदर आणि दीपक अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. तरुणीची हत्या का केली, याची चौकशी पोलीस करत आहेत.