वडिलांसह 28 जणांकडून 17 वर्षीय मुलीवर बलात्कार, पीडितेने पोलिसांसमोर सांगितली आपबीती
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2021 13:07 IST2021-10-13T13:05:36+5:302021-10-13T13:07:19+5:30
UP Lalitpur Rape: आरोपींमध्ये अनेक नातेवाईकांचा समावेश, आजीकडून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न.

वडिलांसह 28 जणांकडून 17 वर्षीय मुलीवर बलात्कार, पीडितेने पोलिसांसमोर सांगितली आपबीती
ललितपूर:उत्तर प्रदेशच्या ललितपूर जिल्ह्यात एका 17 वर्षीय तरुणीवर वडिलांसह 28 जणांनी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पोलिसांकडे दाखल केलेल्या तक्रारीमध्ये त्या तरुणीने समाजवादी पार्टी आणि बहुजन समाज पार्टीच्या काही नेत्यांचीही नावे घेतली आहेत.
आईला जीवे मारण्याची धमकी दिली
टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, आपल्या तक्रारीमध्ये तरुणीने आरोप केला की, 6वीत शिकत असताना वडिलांनी तिला अश्लील व्हिडिओ दाखवून शारीरिक संबंध ठेवले आणि कुणालाही सांगितलं तर आईला ठार मारण्याची धमकी दिली. काही दिवसाननंतर नराधम बापाने गुंगीचे औषध देऊन एका महिलेच्या स्वाधीन केलं. त्या महिलेन तिला एका हॉटेलमध्ये नेल आणि तिथेही अज्ञातांकडून बलात्कार झाला.
नातलगांकडूनही बलात्कार
पुढचे अनेक महिने नवीन पुरुषांकडून तरुणीवर वेगवेगळ्या ठिकाणी अमानुष पद्धतीने बलात्कार करण्यात आला. या सर्व नराधमांमध्ये तरुणीच्या वडिलांसोबत काही नातेवाईक आणि राजकीय नेत्यांचाही समावेश होता. दरम्यान, संबंध बनवायला नकार दिल्यास तरुणीला आईला जीवे मारण्याची धमकी दिली जायची. या धक्कादायक प्रकारामध्ये तिची आजीदेखील आरोपींना मदत करायची.
आज नोंदवली जाणार साक्ष
पण, इतक्या दिवसाच्या अत्याचारानंतर तरुणीने हिम्मत करुन पोलिसांकडे या सर्व प्रकाराची तक्रार केली. याबाबत बोलताना ललितपूरचे एसपी निखिल पाठक म्हणाले, 'ही अत्यंत धक्कादायक घटना आहे आणि आम्ही अतिशय गांभीर्याने या घटनेचा तपास करत आहोत. पीडितेची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आज न्यायालयात पीडितेची साक्ष नोंदवली जाईल आणि पुढील कारवाई केली जाईल.'
या लोकांविरोधात गुन्हा दाखल
तरुणीच्या तक्रारीच्या आधारे ललितपूर पोलिसांनी मुलीचे वडील, सपाचे जिल्हाध्यक्ष, सपाचे शहराध्यक्ष, बसपाचे जिल्हाध्यक्ष यांच्यासह अनेकांविरोधात एफआयआर नोंदवला आहे. त्यांच्याविरोधात कलम 354, 376-डी, 323, 506 आणि आयपीसीच्या इतर कलमांखाली आणि पॉक्सो कायद्याच्या कलम 5/6 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.