मुंबई उपनगरातून १६ हजार लीटर अनधिकृत मद्य पदार्थ साठा जप्त

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2019 03:41 PM2019-04-17T15:41:51+5:302019-04-17T15:42:36+5:30

महिन्याभरात १४२ प्रकरणे, १२८ व्यक्तींना अटक, तर ५ वाहने जप्त; विना परवानगी मद्य साठ्यांवर मुंबई उपनगर जिल्ह्यात धडक कारवाई

16 thousand liters of unauthorized liquor stocks seized from Mumbai suburbs | मुंबई उपनगरातून १६ हजार लीटर अनधिकृत मद्य पदार्थ साठा जप्त

मुंबई उपनगरातून १६ हजार लीटर अनधिकृत मद्य पदार्थ साठा जप्त

Next
ठळक मुद्देआचारसंहितेच्या अंमलबजावणीसाठी मुंबई उपनगर जिल्ह्यात सर्वस्तरीय कार्यवाही सातत्याने व‍ नियमितपणे करण्यात येत आहे. १२८ व्यक्तींना अटक करण्यात आली असून अंदाजे रुपये २ लाख ५५ हजार किमतीची ५ वाहने देखील जप्त करण्यात आली आहेत.

मुंबई - 'लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०१९' च्या पार्श्वभूमीवर मा. भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या सुचनांनुसार आदर्श आचारसंहितेच्या अंमलबजावणीसाठी मुंबई उपनगर जिल्ह्यात सर्वस्तरीय कार्यवाही सातत्याने व‍ नियमितपणे करण्यात येत आहे. याच कार्यवाहीचा भाग म्हणून राज्य उत्पादन शुल्क खात्याद्वारे मुंबई उपनगर जिल्ह्यात ११ मार्च ते १५ एप्रिल २०१९ या कालावधीत करण्यात आलेल्या विविध स्तरीय कार्यवाही दरम्यान १४२ प्रकरणी सुमारे १८ लाखांपेक्षा अधिक किंमतीचा अनधिकृत मद्य पदार्थ साठा जप्त करण्यात आला आहे. याच प्रकरणांमध्ये १२८ व्यक्तींना अटक करण्यात आली असून अवैध मद्यासाठी वाहतूक प्रकरणी सुमारे २ लाख ५५ हजार किमतीची पाच वाहने देखील जप्त करण्यात आली आहेत, अशी माहिती मुंबई उपनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी दिली आहे.

महाराष्ट्र शासनाच्या अखत्यारितील राज्य उत्पादन शुल्क खात्याद्वारे अनधिकृत वा अवैध मद्य साठ‌यावर कारवाई करण्यात येते. सार्वत्रिक निवडणूक विषयक आचारसंहिता लागू झाल्यापासून म्हणजेच ११ मार्च २०१९ पासून मुंबई उपनगर जिल्ह्याच्या हद्दीत देखील या खात्याद्वारे वेळोवेळी धडक कारवाई करण्यात येत आहे. यानुसार ११ मार्च ते ३१ मार्च २०१९ या कालावधीदरम्यान विविध ९३ प्रकरणी सुमारे ९ लाख ४९ हजार ७७५ रुपये इतक्या किमतीचा ९ हजार ९२४ लीटर एवढा अनधिकृत मद्यसाठा जप्त करण्यात आला. या अनुषंगाने ८४ व्यक्तींना अटक करण्यात आली, तर रुपये १ लाख ९५ हजार एवढ्या अंदाजित किमतीची ३ वाहने देखील जप्त्‍ा करण्‍यात आली.
१ एप्रिल २०१९ ते १५ एप्रिल २०१९ या कालावधीदरम्यान विविध ४९ प्रकरणी सुमारे ८ लाख ५३ हजार ७६९ रुपये इतक्या किमतीचा ६ हजार १४० लीटर एवढा अनधिकृत मद्यसाठा जप्त करण्यात आला. या अनुषंगाने ४४ व्यक्तींना अटक करण्यात आली, तर अंदाजे रुपये ६० हजार किमतीची २ वाहने देखील जप्त करण्‍यात आली आहेत.

वरीलनुसार *११ मार्च २०१९ ते १५ एप्रिल २०१९* या कालावधीदरम्यान विविध १४२ प्रकरणी सुमारे १८ लाख ३ हजार ५४४ रुपये इतक्या किमतीचा सुमारे १६ हजार ६४ लीटर एवढा अनधिकृत मद्यसाठा जप्त करण्यात आला आहे. यामध्ये ६१७ लीटर हातभट्टीची दारु, १३ हजार २०० लीटर इतक्या प्रमाणातील मद्य निर्मितीसाठी वापरले जाणारे 'वॉश' रसायन, ५२४.२८ लीटर देशी मद्य, २१८.६३ लीटर विदेशी मद्य, २५१.८७ लीटर बीअर, ताडी १,१९४ लीटर व इतर प्रकारचे ६०.२ लीटर मद्य पदार्थांचा समावेश आहे. तसेच या अनुषंगाने १२८ व्यक्तींना अटक करण्यात आली असून अंदाजे रुपये २ लाख ५५ हजार किमतीची ५ वाहने देखील जप्त करण्यात आली आहेत.

Web Title: 16 thousand liters of unauthorized liquor stocks seized from Mumbai suburbs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.