नवरी जोमात, नवरा कोमात! एक, दोन नव्हे तर लग्नानंतर १२ नववधू झाल्या फरार, नेमकं काय घडलं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2025 11:18 IST2025-10-13T11:17:15+5:302025-10-13T11:18:05+5:30
एक दोन नव्हे तर तब्बल १२ वधू फरार झाल्याने खळबळ उडाली.

नवरी जोमात, नवरा कोमात! एक, दोन नव्हे तर लग्नानंतर १२ नववधू झाल्या फरार, नेमकं काय घडलं?
करवा चौथच्या रात्री विवाहित महिला आपल्या पतींच्या दीर्घायुष्यासाठी उपवास करत असतानाच अलीगढमध्ये एक अशी घटना घडली ज्याने सर्वांनाच हादरवून टाकलं. नववधूंनी करवा चौथचे व्रत केलं, पतीची आरती केली आणि नंतर त्यांच्या कुटुंबियांना विषारी पदार्थ खाऊ घालून लाखो रुपयांची रोख रक्कम आणि दागिने घेऊन पळ काढल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एक दोन नव्हे तर तब्बल १२ वधू फरार झाल्याने खळबळ उडाली.
सासनी गेट पोलीस स्टेशन परिसरात ही धक्कादायक घटना घडली, जिथे आतापर्यंत चार एफआयआर दाखल झाले आहेत आणि पोलिसांनी एका टोळीने हे काम केल्याचं म्हटलं आहे. या सर्व "वधू" बिहार आणि झारखंडमधून आणल्या गेल्या होत्या आणि दलालांनी लग्न करू इच्छिणाऱ्या कुटुंबांमध्ये त्यांचं लग्न लावून दिलं होतं. या दलालांना लग्नासाठी ८०,००० ते १.५ लाख रुपये देण्यात आले होते.
आधी सासू-सासऱ्यांची मनं जिंकली अन् नंतर...
चौकशीत असं दिसून आलं की, लग्नानंतर सर्व बारा वधूंनी त्यांच्या सासू-सासऱ्यांची मनं मोठ्या प्रेमाने जिंकली होती. या सर्वांनी करवा चौथचा उपवास केला, घर सजवलं, मेंदी लावली आणि नवऱ्याला ओवाळलं. कुटुंबातील सदस्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्व वधूंनी स्वतः जेवण तयार केलं आणि जेवणात विषारी पदार्थ टाकला. कुटुंबातील सदस्य बेशुद्ध पडताच बॅगा भरल्या आणि पळून गेल्या.
कुटुंबीयांना मोठा धक्का
सकाळी जेव्हा कुटुंबीय शुद्धीवर आले तेव्हा त्यांना मोठा धक्काच बसला. कपाट उघडं होतं, लॉकर रिकामं होतं आणि नववधू घरात नव्हत्या. या लग्नांमध्ये दलालांची महत्त्वाची भूमिका होती. बहुतेक लग्न तीन ते चार दलालांच्या नेटवर्कद्वारे आयोजित केलं गेलं होतं. जेव्हा मुली पळून गेल्या, तेव्हा पहिला कॉल दलालांच्या नंबरवर लावण्यात आला, परंतु सर्व नंबर बंद होते किंवा कॉलरने उत्तर दिलं नाही.
१२ कुटुंबांची ३० लाखांची फसवणूक
कुटुंबीयांना यानंतर आपली मोठी फसवणूक झाल्याचं लक्षात आलं. पोलीस तपासात असं दिसून आलं आहे की, या १२ नववधूंनी ३० लाख रुपयांहून अधिक पैसे लुटले आहेत. यामध्ये सोन्या-चांदीचे दागिने, रोख रक्कम आणि मोबाईलचा समावेश आहे. या घटनेने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. सर्वत्र या लग्नाची आणि नववधू पळून गेल्याची जोरदार चर्चा रंगली आहे.