अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्यास १0 वर्षे तुरुंगवास
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2019 18:58 IST2019-03-31T18:57:27+5:302019-03-31T18:58:17+5:30
क्रिकेट खेळत असताना वरच्या मजल्यावर बॉल आणण्यासाठी गेलेल्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला होता.

अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्यास १0 वर्षे तुरुंगवास
पुणे : क्रिकेट खेळत असताना वरच्या मजल्यावर बॉल आणण्यासाठी गेलेल्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणा-याला न्यायालयाने १० वर्ष सक्तमजुरी आणि ५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर. व्ही. आदोणे यांनी हा निकाल दिला.
किशोर रामप्रित चौहान याला शिक्षा दिली. अत्याचार झालेल्या ९ वर्षांच्या पीडित मुलीच्या वडिलांनी याबाबत विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. २३ ऑगस्ट २०१५ रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास धानोरीतील एका इमारतीमध्ये हा प्रकार घडला होता. घटनेच्या दिवशी संबंधित मुलगी ही त्यांच्या मोठ्या भावाबरोबर क्रिकेट खेळत होती. क्रिकेट खेळताना बॉल वरच्या मजल्यावर गेला होता. तो आणण्यासाठी पीडित मुलगी वरती गेली. त्यावेळी चौहान याने तिच्यावर अत्याचार केला. बराच वेळ झाल्यानंतरही बहीण खाली न आल्याने तिचा भाऊ वरती गेला. त्यावेळ त्याने हा प्रकार पाहिला. त्याबाबत आई-वडिलांना माहिती दिल्यानंतर चौहानवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या खटल्याचे कामकाज सरकारी वकील लीना पाठक यांनी पाहिले. त्यांनी एकूण १० साक्षीदार तपासले. तत्कालीन पोलिस उपनिरीक्षक सीता लोमटे यांनी गुन्ह्याचा तपास करून दोषारोपपत्र दाखल केले होते. दंडाच्या रक्कमेपैकी ५ हजार रुपये पीडित मुलीला देण्यात यावे, असे आदेशात नमूद आहे.