पप्पाचा फोन घेतला अन् बॉम्बचा कॉल केला; साताऱ्यातील १० वर्षांच्या मुलाचा कारनामा
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2023 06:53 IST2023-08-26T06:53:12+5:302023-08-26T06:53:51+5:30
गुन्हेगारी मालिका पाहण्याचा परिणाम

पप्पाचा फोन घेतला अन् बॉम्बचा कॉल केला; साताऱ्यातील १० वर्षांच्या मुलाचा कारनामा
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : मुंबई विमानतळावरील एका विमानात बॉम्ब ठेवला आहे, ते प्लेन दहा तासानंतर उड्डाण करणार आहे, या कॉलने गुरुवारी खळबळ उडाली. चौकशीत हा कॉल साताऱ्यातील १० वर्षांच्या दिव्यांग मुलाने वडिलांच्या मोबाइलवरून केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी सहार पोलिस ठाण्यात याबाबत नोंद करण्यात आली आहे.
या कॉलच्या अनुषंगाने छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर तत्काळ बैठक घेण्यात आली. सहार पोलिस ठाण्याचे अधिकारी आणि एटीसी पथक, एजन्सीचे प्रतिनिधी उपस्थित होते. चौकशीत, तो कॉल खोटा असल्याचे समजताच सर्वांनी सुटकेचा नि:श्वास टाकला. नवी मुंबईच्या नियंत्रण कक्षात हा कॉल आला होता.
तो कॉल सातारा, देऊळ गावातील विकास माणिकचंद देसाई यांचा क्रमांक असल्याचे समजले. पोलिसांनी त्यांच्याकडे चौकशी करताच, तो कॉल त्यांचा १० वर्षीय दिव्यांग मुलाने चुकून केल्याचे सांगितले.
गुन्हेगारी मालिका पाहण्याचा परिणाम
मुलगा घरातच असल्याने सतत गुन्हेगारी जगतावरील मालिका पाहण्याची त्याला आवड असून त्यातूनच त्याला ११२ हा क्रमांक मिळाला व त्याने कॉल केल्याचे समोर आले. त्याच्या वडिलांचे किराणा दुकान आहे. मुलाने टाईमपास म्हणून घरात खेळता खेळता हा कॉल केल्याचे सांगितले.