Crime: घरात एकटीच होती प्रेयसी, प्रियकर भेटायला गेला, तेवढ्यात आला भाऊ अन्...शेवट भयंकर!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2025 16:22 IST2025-11-01T16:14:31+5:302025-11-01T16:22:02+5:30
Chhattisgarh Love Affair Murder: छत्तीसगडमधील दुर्ग जिल्ह्यातील भिलाई येथील माझीपारा परिसरात एक धक्कादायक घटना घडली.

Crime: घरात एकटीच होती प्रेयसी, प्रियकर भेटायला गेला, तेवढ्यात आला भाऊ अन्...शेवट भयंकर!
छत्तीसगडमधील दुर्ग जिल्ह्यातील भिलाई येथील माझीपारा परिसरात एक धक्कादायक घटना घडली. एका २५ वर्षीय तरुणाची प्रेमप्रकरणातून हत्या करण्यात आली. मृत तरुण आपल्या प्रेयसीला भेटण्यासाठी तिच्या घरी गेला असता तिच्या भावाने इतर नातेवाईकांसह त्याला बेदम मारहाण केली, या घटनेत त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी मुलीचा एक सख्खा आणि दोन चुलत भावांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून अन्य दोन आरोपींचा शोध सुरू आहे.
मृतक धीरज सरोज उर्फ विकी (वय, २५) असे मृत तरुणाचे नाव असून हा भिलाईतील माझीपारा भागात वास्तव्यात होता. धीरजचे मुख्य आरोपीच्या बहिणीसोबत प्रेमसंबंध होते. घटनेच्या दिवशी मुलीची आई कामानिमित्त घराबाहेर गेली होती. तर, तिचा भाऊ कामावर गेला होता. मुलीच्या घरी कोणीच नसल्याचे समजताच धीरज तिच्या घरी गेला. थोड्याच वेळात मुलीचा भाऊ घरी आला आणि त्याने धीरजला आणि त्याच्या बहिणीला एकत्र पाहिलं. यामुळे तो संतापला आणि त्याने त्याच्या चुलत भावांना बोलावले. त्यांनी घराचा दरवाजा बंद करून धीरजला बेदम मारहाण केली. या घटनेत डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी धीरजच्या आईने पोलिसांत तक्रार दाखल केली.
पोलिसांची कारवाई
कॅन्टोन्मेंटचे सीएसपी हेम प्रकाश नायक यांनी सांगितले की, या प्रकरणात पाच आरोपींची ओळख पटली आहे, त्यापैकी तीन जणांना अटक करण्यात आली. पोलिसांनी पुढील तपास सुरू ठेवला आहे, तसेच फरार आरोपींचा शोध घेत आहेत. या घटनामुळे छत्तीसगडमधील भिलाईतील स्थानिक समाजात धक्काच बसला आहे. प्रेमाच्या प्रकरणातून घडलेल्या या भयंकर हत्येने सर्वांनाच शोकात पाडले आहे.