ट्रक अन् कारची भीषण धडक; पोलीस उपनिरीक्षकासह संपूर्ण कुटुंब मृत्युमुखी
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2023 14:03 IST2023-05-10T14:00:16+5:302023-05-10T14:03:55+5:30
ट्रक आणि कारची समोरासमोर जोरदार धडक झाली. त्यामध्ये, कार ट्रकच्या खालीच गेल्याचं दिसून येत आहे.

ट्रक अन् कारची भीषण धडक; पोलीस उपनिरीक्षकासह संपूर्ण कुटुंब मृत्युमुखी
छत्तीसगडच्या कोरबा जिल्ह्यातील मोरगा पोलीस ठाणे अंतर्गत मदनपूर फॉरेस्ट बेरियरजवळ भरधाव ट्रक आणि कारचा भीषण अपघात झाला. या अपघातात एका पोलीस अधिकाऱ्यासह त्यांच संपूर्ण कुटुंब मृत्युमुखी पडलं. या दुर्घटनेत पोलीस उपनिरीक्षक, त्यांची पत्नी आणि दोन मुलींचे निधन झाले. आज सकाळी पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडल्याची प्राथमिक माहिती आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह बाजुला काढले. या अपघातानंतर सर्वांनीच हळहळ व्यक्त केली.
ट्रक आणि कारची समोरासमोर जोरदार धडक झाली. त्यामध्ये, कार ट्रकच्या खालीच गेल्याचं दिसून येत आहे. अपघातानंतर ट्रकचालक फरार झाला आहे. घटनेनंतर स्थानिकांनी अपघातस्थळी गर्दी केली, त्यानंतर पोलिसांशी संपर्क साधण्यात आला. मोरगा पोलीस ठाण्याचे प्रभारी अश्वनी निरंकारी यांनी सांगितले की, मृत मनोजकुमार तिर्की हे अम्बिकापूरचे रहिवाशी होते. ते बस्तरच्या बकावंड व बोधघाट येथील पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारही राहिले होते. सध्या त्यांना संरक्षित केंद्रात ड्युटी देण्यात आली होती. अम्बिकापूर येथून जगदलपूरला जात असताना त्यांच्या कारला भीषण अपघात झाला.
दरम्यान, पोलिसांकडून घटनेचा अधिक तपास सुरू असून फरार ट्रकचालकाचा शोध घेण्यात येत आहे.