Shocking: "आई-बाबा मला माफ करा, मी चांगली मुलगी होऊ शकली नाही", चिठ्ठी लिहून मुलीचा आयुष्याचा शेवट!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2026 15:51 IST2026-01-05T15:49:14+5:302026-01-05T15:51:04+5:30
Chhattisgarh Suicide: छत्तीसगडमधील दुर्ग जिल्ह्यातील या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

Shocking: "आई-बाबा मला माफ करा, मी चांगली मुलगी होऊ शकली नाही", चिठ्ठी लिहून मुलीचा आयुष्याचा शेवट!
"आई-बाबा मला माफ करा, मी घेत असलेले पाऊल योग्य नाही. पण तरीही मी आत्महत्या करत आहे. मी एक चांगली मुलगी होऊ शकली नाही. माझ्या बहिणीची काळजी घ्या आणि तिची सर्व स्वप्ने पूर्ण करा..." अशी सुसाईड नोट लिहून एका १६ वर्षीय मुलीने गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवली. छत्तीसगडमधील दुर्ग जिल्ह्यातील या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आत्महत्येची नोंद करून पुढील तपासाला सुरुवात केली आहे.
दुर्ग येथील मोहन नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या शंकर नगर भागात ही घटना घडली. निष्ठा गोस्वामी (वय, १६) असे मृत मुलीचे नाव असून ती इयत्ता दहावीत शिकत होती. निष्ठाचे वडील अनिल गोस्वामी हे सरकारी वकील आहेत. तर, आई सरकारी शाळेत शिक्षिका आहे. दरम्यान, नेहमीप्रमाणे निष्ठा दुपारी अभ्यास करण्यासाठी आपल्या खोलीत गेली. मात्र, संध्याकाळ झाली तरी ती खोलीबाहेर आली नाही. घटनेच्या वेळी तिचे आई-वडील कामावर गेले होते आणि घरी केवळ तिची आजी होती. बराच वेळ होऊनही निष्ठाने दरवाजा उघडला नाही, तेव्हा आजीला संशय आला. आजीने तातडीने पालकांना याची माहिती दिली. कुटुंबीयांनी घरी येऊन दरवाजा तोडला असता, निष्ठाचा मृतदेह खोलीत लटकलेल्या अवस्थेत आढळला.
या घटनेची माहिती मिळताच मोहन नगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. झडतीदरम्यान पोलिसांना निष्ठाने लिहिलेली एक सुसाईड नोट सापडली. या चिठ्ठीत तिने आपल्या आई-वडिलांची माफी मागितली असून, आपण चांगली मुलगी होऊ शकलो नाही, अशी खंत व्यक्त केली. तसेच आपल्या लहान बहिणीची काळजी घेण्याची विनंतीही तिने पालकांना केली आहे.
भिलाई येथील सेक्टर १० मधील शंकरा विद्यालयात शिकणारी निष्ठाने इतके टोकाचे पाऊल का उचलले? याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून, निष्ठाचा मोबाईल फोन जप्त केला आहे. मोबाईलच्या तांत्रिक तपासातून आणि कुटुंबीयांच्या चौकशीतून आत्महत्येचे गूढ उकलण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.