समलैंगिक डेटिंग ॲपवरून भेटण्यासाठी बाेलावून तरुणांची लुट; बी.एस्सी, नर्सिंगचे विद्यार्थी अटकेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2025 12:04 IST2025-05-20T12:02:34+5:302025-05-20T12:04:00+5:30
सुशिक्षित तरुणांची टोळी; गेल्या नऊ महिन्यांत या टोळीने १० पेक्षा अधिक तरुणांना लुटले असल्याची माहिती

समलैंगिक डेटिंग ॲपवरून भेटण्यासाठी बाेलावून तरुणांची लुट; बी.एस्सी, नर्सिंगचे विद्यार्थी अटकेत
छत्रपती संभाजीनगर : समलैंगिकांच्या डेटिंग ॲपवर बनावट प्रोफाइल तयार करून शहरात तरुणांना लुटणारी टोळी सक्रिय झाली आहे. गेल्या नऊ महिन्यांत या टोळीने १० पेक्षा अधिक तरुणांना लुटले. दौलताबादच्या एका तरुणाने पोलिसांकडे तक्रार करण्याची हिंमत केल्यानंतर ही धक्कादायक बाब उघडकीस आली. यात दौलताबाद पोलिसांनी शोध घेत वडगाव कोल्हाटी परिसरातून तिघांना अटक केली.
२५ वर्षीय तरुण राकेशचे (नाव बदलले आहे) दौलताबादमध्ये हॉटेल आहे. १६ मे रोजी फेसबुकवर त्याला समलैंगिकांचे 'वॉल ॲपची' (Wall App) जाहिरात दिसली. ते ॲप इंस्टॉल केल्यावर त्याला एका प्रोफाइलधारकाचा मेसेज आला. त्याने शहरातलाच असल्याचे सांगितल्यावर त्यांनी दुपारी भेटण्याचे ठरवले. दुपारी २ वाजता तीसगाव फाट्यावर दोघे भेटले. तेथून त्याने राकेशला करोडी टोलनाका परिसरात नेले. काही वेळात त्याचे दोन साथीदार तेथे गेले व त्यांनी राकेशला मारहाण सुरू केली. मोबाइलमध्ये चित्रीकरण करून तू समलैंगिक असल्याचे व्हायरल करतो, असे धमकावले. राकेशने विनवण्या केल्या. मात्र, टोळीने त्याच्याकडे पैशांची मागणी केली. कुटुंबाला अपघाताचे कारण सांगून ऑनलाइन पैसे मागायला लावले. राकेशच्या आईने त्याला ३ हजार रुपये पाठवताच जवळील पंपावरून आरोपींनी रोख काढून घेत पोबारा केला.
गाडीवरून काढला माग
राकेशने याप्रकरणी रविवारी पोलिसांकडे धाव घेतली. पोलिस उपायुक्त नितीन बगाटे यांना हा प्रकार कळताच त्यांनी दौलताबादच्या निरीक्षक रेखा लोंढे, उपनिरीक्षक कृष्णा घायाळ यांना तपासाच्या सूचना केल्या. आराेपींच्या दुचाकीच्या वर्णनावरून शोध सुरू केला. त्यात दुचाकी वडगाव कोल्हाटी परिसरातील असल्याची माहिती प्राप्त झाली. त्यावरून उपनिरीक्षक कृष्णा घायाळ, सहायक फौजदार पाटेकर, अंमलदार कैलास जाधव, महेश घुगे, ज्ञानेश्वर कोळी, अविनाश बरवंट यांनी आराेपींचे घर गाठत राहुल राजू खांडेकर (२०), आयुष संजय लाटे (२१), शिवम सुरेश पवार (२४, सर्व रा. वडगाव कोल्हाटी) यांना अटक केली.
पाच पीडित निष्पन्न, प्रत्यक्षात अनेक
राहुल बीएस्सी, आयुष, शिवम नर्सिंगचे विद्यार्थी आहेत. सध्या चार तक्रारदार समोर आले आहेत. प्रत्यक्षात टोळीने ॲपद्वारे अनेकांना लुटले असावे. फसलेल्यांनी समोर यावे, त्यांची ओळख गुप्त ठेवली जाईल. नागरिकांनी अशा फसव्या ॲपवर विश्वास ठेवू नये.
-उपायुक्त नितीन बगाटे