वाळूज येथून तरुण बेपत्ता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:11 IST2021-01-08T04:11:56+5:302021-01-08T04:11:56+5:30
वाळूज महानगर : वाळूज येथून २१ वर्षीय तरुण बेपत्ता झाल्याची तक्रार त्याच्या भावाने वाळूज पोलीस ठाण्यात दिली. शेख ...

वाळूज येथून तरुण बेपत्ता
वाळूज महानगर : वाळूज येथून २१ वर्षीय तरुण बेपत्ता झाल्याची तक्रार त्याच्या भावाने वाळूज पोलीस ठाण्यात दिली.
शेख इम्रान शेख सलीम (वय २१, रा.भारतनगर, वाळूज) हा ४ जानेवारी रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास आरटीओ कार्यालयात जाऊन येतो, असे म्हणून घराबाहेर पडला होता. मात्र, अद्यापपर्यंत इम्रान घरी परत आला नाही. त्याचा भाऊ शेख अलीम याने लहान भाऊ बेपत्ता झाल्याची तक्रार दिली आहे. पोहेकॉ. एन. एम. मालोदे हे शोध घेत आहेत.
फोटो क्रमांक- शेख इम्रान
----------------------
साऊथसिटीत सुविधा पुरवा
वाळूज महानगर : साऊथसिटीत विविध नागरी सुविधा परविल्या जात नसल्याने नागरिकांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. या परिसरातील बहुतांश रस्ते कच्चे असल्याने व रस्त्यावर खड्डे पडल्याने नागरिक व वाहनधारकांना ये-जा करताना त्रास सहन करावा लागत आहे. मुख्य रस्त्यावरील अनेक ठिकाणी पथदिवे बंद असल्याने नागरिकांना अंधारातून ये-जा करावी लागते. स्वच्छतेकडे ग्रामपंचायत प्रशासन डोळेझाक करीत असल्याने नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. या वसाहतीत किमान नागरी सुविधा पुरविण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.
--------------------------
भारतनगरातील रस्ते झाले अरुंद
वाळूज महानगर : वाळूजच्या भारतनगरात अनेकांनी मुख्य रस्त्यालगत अतिक्रमण केल्यामुळे या भागातील रस्ते अरुंद झाले आहेत. या कामगार वसाहतीत अनेकांनी घरासमोरच टपऱ्या, छोटी दुकाने, हातगाड्यावर दुकाने थाटल्यामुळे वाहनधारक व नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. नागरिक त्यांची दुचाकी व चारचाकी वाहने रस्त्यावरच उभी करतात. कारवाई करण्याऐवजी ग्रामपंचायत प्रशासन अतिक्रमणांना अभय देत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
----------------------
खंडित वीजपुरवठ्याने नागरिक त्रस्त
वाळूज महानगर : पंढरपुरात सतत वीजपुरवठा खंडित होत असल्यामुळे वीज ग्राहक त्रस्त झाले आहेत. बुधवारी सायंकाळी या परिसरात पावसाने हजेरी लावल्यानंतर जवळपास अर्धा तास वीजपुरवठा खंडित झाला होता. महावितरण ग्राहकांना कुठलीही पूर्वसूचना न देता वीजपुरवठा खंडित करते. गावात सुरळीत वीजपुरवठा करण्याची मागणी शेख मन्सूर, एकनाथ कीर्तीकर आदींनी केली आहे.
-----------------------------
उद्योगनगरीत अॅपेचालकांची दादागिरी
वाळूज महानगर : वाळूज उद्योगनगरीत अॅपेरिक्षाचालकांची दादागिरी वाढल्यामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. बसथांब्यावर उभ्या असलेल्या प्रवाशांना अक्षरश: ओढतच चालक रिक्षामध्ये बसण्याचा आग्रह करतात. प्रवाशांनी रिक्षात बसण्यास नकार देताच त्यांना शिवीगाळ केली जाते. क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी रिक्षात बसवून वेगाने चालविल्या जात असल्याने अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. या मुजोर अॅपेरिक्षा चालकाविरुध्द कारवाई करण्याची मागणी प्रवाशांतून होत आहे.
---------------------