सहा तासांत तरुणाला तीन वेळा लुटले; चाकूचा धाक दाखवून ऑनलाइन पैसे उकळले
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2025 13:40 IST2025-12-05T13:38:53+5:302025-12-05T13:40:13+5:30
वाहतूक पोलिसांनी दुपारी पकडलेल्या गुन्हेगाराचा त्याच दिवसातील दुसरा गुन्हा उघड झाला

सहा तासांत तरुणाला तीन वेळा लुटले; चाकूचा धाक दाखवून ऑनलाइन पैसे उकळले
छत्रपती संभाजीनगर : बुधवारी मुकुंदवाडीत एका ज्येष्ठ नागरिकाला लुटल्याची घटना ताजी असतानाच, त्याचदरम्यान ८ वाजता गारखेड्यात एका तरुणाला कुख्यात गुन्हेगार साईनाथ ऊर्फ पिन्या गणेश खडके (२२, रा. भारतनगर) याने हारुन रसूल शेख याच्यासह लुटले. दोघांनी धारदार चाकूने धमकावत ऑनलाइन सहा हजार रुपये लुटले. विशेष म्हणजे, याच गुन्हेगाराला दुपारी वाहतूक पोलिसांनी धारदार चाकूसह पकडले होते. यात खडकेला अटक केली असून, न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावल्याचे पुंडलिकनगरचे पोलिस निरीक्षक अशोक भंडारे यांनी सांगितले.
एका औषधी कंपनीत काम करणारा २५ वर्षीय ओंकार बाबासाहेब शिंदे (रा. गुरुदत्तनगर) हा दि. २ रोजी सायंकाळी ६:३० वाजता कारगिल मैदानावर बसलेला होता. तेथेच बसलेल्या पिन्या, हारुनने त्याच्याकडे त्याची दुचाकी मागितली. ओंकारने त्याला नकार दिला. तेव्हा पिन्याने धमकावले होते. दि. ३ रोजी सकाळी ८ वाजता ओंकार भारतनगरमधून जात असताना पिन्याने त्याला गाठले. खिशातून मोठा चाकू काढून मारून टाकण्याची धमकी देत १० हजार रुपयांची मागणी केली. एकटाच असल्याने ओंकारने त्याला ५ हजार रुपये ऑनलाइन ट्रान्स्फर केले. हारुनने पुन्हा ३ हजार रुपये ऑनलाइन घेतले. त्यानंतर घाबरलेला ओंकार घरी गेला.
घर गाठत पुन्हा पैसे मागितले
ओंकार घाबरल्याचे पाहून हारुनने पुन्हा दुपारी २ वाजता त्याचे घर गाठले. शस्त्राचा धाक दाखवून त्याला पुन्हा ७ हजार रुपयांची मागणी केली. मात्र, त्याच्या नकळत ओंकारने घरातून पळ काढत थेट पोलिस ठाणे गाठले. सर्व प्रकार सांगितला. त्यानंतर पोलिस निरीक्षक अशोक भंडारे यांच्या सूचनेवरून पथकाने पिन्याला रात्री अटक केली.
हारुन पैसे मागत असताना पिन्या पोलिसांच्या ताब्यात
दरम्यान, पैसे घेऊन पिन्या बुधवारी दुपारी न्यायालयात गेला होता. तेथून बाहेर पडताच वाहतूक पोलिसांनी त्याला त्याच्या दुचाकीला नंबर प्लेट नसल्याने पकडले. तेव्हा तो चाकूसह हाती लागला. त्याच वेळेला हारुन ओंकारच्या घरी पैसे मागायला गेला होता. क्रांतीचौक पोलिसांनी नोटीस देऊन सोडल्यानंतर पुंडलिकनगर पोलिसांनी पकडले. त्याच्यावर आतापर्यंत ६ गुन्हे असून, २०२३ मध्ये एमपीडीएअंतर्गत एक वर्ष कारागृहात स्थानबद्ध होता.