'तू भाजपचे काम केले, दिसलास की मारून टाकणार'; माजी नगरसेवकाची पदाधिकाऱ्याला धमकी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2026 15:26 IST2026-01-24T15:25:37+5:302026-01-24T15:26:05+5:30
या प्रकरणी पुंडलिकनगर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

'तू भाजपचे काम केले, दिसलास की मारून टाकणार'; माजी नगरसेवकाची पदाधिकाऱ्याला धमकी
छत्रपती संभाजीनगर : निवडणुकीत तू भाजपचे काम केले. आता तू आमचा शत्रू झाला असून तुला शंभर टक्के जीवे ठार मारणार, असे म्हणत माजी नगरसेवक गजानन मनगटेने सामाजिक संघटनेच्या पदाधिकाऱ्याला कॉलवर धमकावले. याप्रकरणी मनगटे (रा. न्यायनगर) वर शुक्रवारी पुंडलिकनगर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
ज्ञानेश्वर गायकवाड (४६, रा. बंबाटनगर) यांनी तक्रारीत केलेल्या आरोपानुसार, मनपा निवडणुकीनंतर २२ जानेवारीला त्यांनी सोशल मीडियावर शिंदेसेनेचे जिल्हाध्यक्ष तथा नवनियुक्त नगरसेवक राजेंद्र जंजाळ यांच्यासोबत छायाचित्र पोस्ट केले होते. त्यावर गजानन मनगटेने अश्लील कमेंट केली.
याबाबत गायकवाड यांनी त्यांना कॉल केला. तेव्हा मनगटे यांनी त्यांना तलवारीने वार करून जीवे मारण्याची धमकी दिली. '२०२४ मध्येही तु भाजपचे काम केले. आता तु माझा शत्रु झाला आहे. माझ्या नादी लागू नकोस, माझ्या चार कंपन्या असून दिसला की मारून टाकील', असे म्हणत धमकावले. शिवाय, जातीय वक्तव्यही केले. यामुळे स्वत:सह कुटुंबाला धोका असल्याची तक्रार गायकवाड यांनी पुंडलिकनगर पोलिसांकडे केली.