व्हिसाची मुदत संपूनही भारतात वास्तव्य, येमेनचा तरुण छ. संभाजीनगरमधून पोलिसांच्या ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2026 13:36 IST2026-02-13T13:35:45+5:302026-02-13T13:36:29+5:30

विद्यापीठात प्रवेशासाठी होता प्रयत्नात; २०१४ मध्ये बंगळुरूसाठी व्हिसा मिळवून भारतात प्रवेश

Yemen youth arrested in Chhatrapati Sambhajinagar for staying in India despite visa expiry | व्हिसाची मुदत संपूनही भारतात वास्तव्य, येमेनचा तरुण छ. संभाजीनगरमधून पोलिसांच्या ताब्यात

व्हिसाची मुदत संपूनही भारतात वास्तव्य, येमेनचा तरुण छ. संभाजीनगरमधून पोलिसांच्या ताब्यात

छत्रपती संभाजीनगर : व्हिसाची मुदत संपल्यानंतरही चोरून देशात वास्तव्य करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात प्रवेशासाठी प्रयत्नात असलेला येमेनचा नागरिक मोहम्मद अहमद अली बिनाशिखबुकर (वय ३१) याला पोलिस दलाच्या दहशतवादविरोधी कक्षाने ताब्यात घेतले. बुधवारी रात्री ही कारवाई करण्यात आली.

पोलिसांच्या माहितीनुसार, येमेनचे नागरिकत्व असलेला अहमद ऑक्टोबर २०१४ मध्ये विद्यार्थी व्हिसावर भारतात दाखल झाला होता. त्यावेळी त्याने बंगळुरू, कर्नाटक येथील नोंदणी करून व्हिसा मिळवला होता. बंगळुरूत वास्तव्यास असतानाच मार्च २०१७ मध्ये त्याच्या व्हिसाची वैधता संपली होती. त्यानंतर त्याने बंगळुरू सोडले व दोन वर्षे इतरत्र राहिला. काही वर्षांपूर्वी त्याने शहर गाठत बेगमपुऱ्यातील जयसिंगपुऱ्यात मुक्काम ठोकला. तेथे २ हजार २०० रुपये प्रतिमहिना भाडेतत्त्वावर राहण्यास सुरुवात केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात प्रवेश घेण्यासाठी तो प्रयत्नात होता. यापूर्वी शहरात आलेल्या येमेन व अन्य देशांच्या तरुणांच्या तो संपर्कात असल्याचे सूत्रांनी सांगितले. दहशतवाद विरोधीकक्षाला त्याच्याबाबत माहिती मिळताच पोलिस आयुक्त प्रवीण पवार, उपायुक्त रत्नाकर नवले यांच्या सूचनेवरून त्याला ताब्यात घेतले. येमेनच्या दूतावासाला याबाबत पत्रव्यवहार करण्यात आल्याचे उपायुक्त नवले यांनी सांगितले.

घरमालकावर कारवाई नाही
अहमदचे वडील येमेन येथे शिक्षक असून, ते दर महिन्याला त्याला खर्चासाठी पैसे पाठवत होते. केंद्रीय तसेच राज्य गुप्तचर यंत्रणा, दहशतवादविरोधी पथक याबाबत अनभिज्ञ होते. विदेशी व परराज्यातील नागरिक भाडेतत्त्वावर वास्तव्यास असल्यास पोलिसांना माहिती देणे बंधनकारक आहे. मात्र, अहमद राहत असलेल्या घरमालकाने कुठलाही भाडेकरार केला नाही. शिवाय, विदेशी नागरिकाच्या वास्तव्याबाबतही पोलिसांना कळवले नाही. गुरुवारी रात्रीपर्यंत या घरमालकावर कुठलीही कारवाई करण्यात आली नव्हती.

Web Title : वीज़ा अवधि समाप्त होने पर भी छत्रपति संभाजीनगर में यमनी नागरिक गिरफ्तार

Web Summary : छत्रपति संभाजीनगर में एक यमनी नागरिक को वीज़ा अवधि समाप्त होने के बाद भी रहने के आरोप में गिरफ्तार किया गया। वह डॉ. बाबासाहेब अम्बेडकर मराठवाड़ा विश्वविद्यालय में प्रवेश पाने की कोशिश कर रहा था। पुलिस उसके संपर्कों और मकान मालिक की जांच कर रही है जिसने विदेशी किराएदार की सूचना नहीं दी।

Web Title : Yemeni Overstaying Visa Arrested in Chhatrapati Sambhajinagar, Seeking University Admission

Web Summary : A Yemeni national, overstaying his visa since 2017, was arrested in Chhatrapati Sambhajinagar. He was trying to get admission to Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University. Police are investigating his contacts and the landlord who failed to report his foreign tenant.