दंगलीची वर्षपूर्ती; आठ गुन्ह्यांचे दोषारोपपत्र न्यायालयात दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2019 07:17 PM2019-05-11T19:17:09+5:302019-05-11T19:19:09+5:30

पोलिसांनी ११० दंगलखोरांना अटक करून त्यांच्या विरोधात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले

Year of the riots; Trial of eight offenses filed in court at Aurangabad | दंगलीची वर्षपूर्ती; आठ गुन्ह्यांचे दोषारोपपत्र न्यायालयात दाखल

दंगलीची वर्षपूर्ती; आठ गुन्ह्यांचे दोषारोपपत्र न्यायालयात दाखल

googlenewsNext
ठळक मुद्दे११ मे रोजी रात्री मोतीकारंजा येथे किरकोळ कारणावरून दोन गटांत हाणामारी झालीदगडफेक आणि लुटालुटीचे प्रकार दुसऱ्या दिवशी १२ मे रोजीही रात्रभर सुरू

औरंगाबाद : गतवर्षी किरकोळ कारणावरून दोन समुदायांत झालेल्या भीषण दंगलीला ११ मे रोजी वर्ष होत आहे. या दंगलीनंतर दोन समुदायांत निर्माण झालेला दुरावा कमी करण्यासाठी पोलीस आयुक्तांनी सातत्याने प्रयत्न केले. याप्रकरणी सिटीचौक, क्र ांतीचौक आणि जिन्सी पोलीस ठाण्यात एकूण १६ गुन्ह्यांची नोंद झाली होती. या सर्व गुन्ह्यांत पोलिसांनी ११० दंगलखोरांना अटक करून त्यांच्या विरोधात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले असून, अटकेतील आरोपी जामिनावर आहेत.

सूत्रांनी सांगितले की, ११ मे रोजी रात्री मोतीकारंजा येथे किरकोळ कारणावरून दोन गटांत हाणामारी झाली. या हाणामारीचे रुपांतर दंगलीत झाले. राजाबाजार, मोतीकारंजा, नवाबपुरा, शहागंज, चेलीपुरा आदी भागांत जाळपोळ, दगडफेक आणि लुटालुटीचे प्रकार दुसऱ्या दिवशी १२ मे रोजीही रात्रभर सुरू होते. एसआरपी आणि स्थानिक पोलिसांनी केलेल्या जोरदार कारवाईनंतर दंगलीवर नियंत्रण आणणे शक्य झाले होते. यावेळी पोलिसांच्या गोळीबारात एका मुलाचा तर दंगेखोरांनी घराला लावलेल्या आगीत वृद्धाचा होरपळून मृत्यू झाला.

याशिवाय दगडफेक आणि पोलिसांच्या गोळीबारात जखमी झालेल्यांची संख्या ३० हून अधिक होती. मात्र, जखमींपैकी मोजकेच चार ते पाच जण सरकारी रुग्णालयात दाखल झाले होते. उर्वरित जखमींनी खाजगी आणि बाहेरगावच्या रुग्णालयात उपचार घेतल्याने त्यांची नावे समजू शकली नव्हती. यावेळी जमावाने केलेल्या जाळपोळ, लुटालूट आणि दगडफेकीत कोट्यवधींचे नुकसान झाले. या दंगलीप्रकरणी सिटीचौक  ठाण्यात दहा, जिन्सी आणि क्रांतीचौक पोलीस ठाण्यात प्रत्येकी तीन, असे एकूण १६ गुन्हे पोलिसांनी नोंदविले होते. यापैकी गुन्ह्यांचा तपास करून दोन नगरसेवकांसह एकूण ११० आरोपींना अटक केली आणि त्यांच्याविरोधात न्यायालयात ८ गुन्ह्यांत दोषारोपपत्रे दाखल केली. तर ३ गुन्ह्यांत ‘अ’ समरी तर एका गुन्ह्यात ‘ब’ समरी अहवाल पाठविला. ४ गुन्ह्यांचा तपास चालू आहे.

जखमी एसीपी आले मृत्यूच्या दाढेतून बाहेर
या दंगलीत तत्कालीन सहायक पोलीस आयुक्त गोवर्धन कोळेकर यांच्यासह पाच अधिकारी आणि सुमारे २५ कर्मचारी जखमी झाले होते. जखमींपैकी कोळेकर यांच्या स्वरयंत्राला गंभीर दुखापत झाल्याने ते मृत्यूच्या दाढेत गेले होते. डॉक्टरांनी केलेल्या अथक प्रयत्नांमुळे कोळेकर हे बचावले, मात्र त्यांना तब्बल चार महिने उपचार घ्यावे लागले होते.

Web Title: Year of the riots; Trial of eight offenses filed in court at Aurangabad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.