“कोणत्याही क्षेत्रात काम करा, पण ते क्षेत्र आपला पेशा बनवा; धंदा नव्हे”; नाना पाटेकरांचा सल्ला
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2025 13:16 IST2025-11-26T13:08:43+5:302025-11-26T13:16:31+5:30
प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांचा सल्ला; एमजीएममध्ये आंतरविद्यापीठीय युवा महोत्सवास सुरुवात

“कोणत्याही क्षेत्रात काम करा, पण ते क्षेत्र आपला पेशा बनवा; धंदा नव्हे”; नाना पाटेकरांचा सल्ला
छत्रपती संभाजीनगर : आपण कोणत्याही क्षेत्रात काम करत असू ते क्षेत्र आपला पेशा व्हायला हवा धंदा नाही. कलाकाराची सुख आणि दु:खाची व्याख्या बदलायला हवी. ‘नाम’च्या माध्यमातून काम करताना राज्यातील शेतकऱ्यांना जेव्हा भेटलो, तेव्हा मला लक्षात आले की, त्यांच्या दुःखापुढे आपलं दुःख काहीच नाही. आपल्या दु:खापेक्षा खूप मोठी दु:खं या जगात आहेत, असे प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांनी युवकांशी संवाद साधताना सांगितले.
एमजीएम विद्यापीठात असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीज (एआययू) च्या ३९ व्या आंतर विद्यापीठीय सेंट्रल झोन युवा महोत्सवाचे उद्घाटन नाना पाटेकर यांच्या हस्ते मंगळवारी झाले. यावेळी एमजीएमचे उपाध्यक्ष डॉ.पी.एम. जाधव, विश्वस्त भाऊसाहेब राजळे, कुलगुरू डॉ. विलास सपकाळ, कुलसचिव डॉ. आशिष गाडेकर, ‘एआययू’चे अधिकारी डॉ. निर्मल जौरा, दीपक कुमार झा, महोत्सवाचे सचिव डॉ. शिव कदम यांची उपस्थिती होती.
यावेळी नाना पाटेकर म्हणाले, आपण स्वत:कडे पाहायला पाहिजे. स्वत:तील उणिवा समजणे आवश्यक आहे. हे एकदा समजले की, आयुष्य सोपे होऊन जाते. आज पेक्षा उद्या कसे उत्तम होता येईल, याचा विचार करत पुढे जाणे आवश्यक आहे. बदल जर कोणी करू शकेल तर तो देशाची तरुणाई करेल, यावर मला विश्वास आहे. आपण जागरूकपणे पुढे जात असताना गर्दीचा भाग बनू नका. आपल्या देशाचे भविष्य उज्ज्वल असून ते तुमच्या हातात आहे. जे काही करायचे आहे ते मनातून करायचे. जगात कोणतीही क्रांती झाली तर त्याची सुरुवात रंगमंचावरून झालेली आहे. आज आपल्या आजूबाजूला राजकीय, सामाजिक जे काही सुरू आहे त्यावर आपण आपल्या अभिनयाने भाष्य करू शकतो. ५० वर्षे झाली या क्षेत्रात काम करत असूनही मी स्वत:ला कलाकार म्हणत नाही, कारण आणखी मला खूप काही शिकायचे असल्याचे पाटेकर यांनी सांगितले. यावेळी उपाध्यक्ष जाधव, कुलगुरू सपकाळ आणि डॉ. जौरा यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक कुलसचिव डॉ. आशिष गाडेकर यांनी केले. सूत्रसंचालन ऐश्वर्या थावरे आणि सांझ यांनी केले. डॉ. शिव कदम यांनी आभार मानले.
‘जगाव की मरावं’...ने जिंकली मने
पाटेकर यांनी विविध राज्यातील कलावंत असल्यामुळे हिंदीतून संवाद साधला. शेवटी विद्यार्थ्यांनी संवाद सादर करण्याची मागणी केली. त्यावर नानांनी नटसम्राट चित्रपटातील ‘जगाव की मरावं हा एकच सवाल आहे. ह्या दुनियेच्या उकिरड्यावर खरकट्या पत्रावळीचा तुकडा होऊन जगावं बेशरम लाचार आनंदानं?’ हा डायलॉग सादर केला. त्यास युवकांनी जोरदार प्रतिसाद दिला.
सैन्याला सन्मान मिळावा
प्रहार चित्रपट करताना मी ३ वर्षे सैन्यात घालवले. त्यामुळे माझं संपूर्ण आयुष्य बदलून गेले. सीमेवर २०-२२ वर्षांची मुले देशाचे संरक्षण करतात. दुसऱ्या देशात सैनिक आला तर त्याला राष्ट्रपतीही सॅल्युट करतात, पण आपल्या देशात सैन्याला जो सन्मान मिळायला हवा तो मिळत नसल्याची खंत नाना पाटेकर यांनी व्यक्त केली.
तीन राज्यातील ११०० कलावंत
‘एआययू’च्या विभागीय महोत्सवात मध्यप्रदेश, महाराष्ट्र आणि छत्तीसगढ राज्यातील २३ विद्यापीठातील ११०० पेक्षा अधिक विद्यार्थी कलावंतांनी सहभाग घेतला आहे. हा महोत्सव २९ नोव्हेंबरपर्यंत चालणार आहे.