ग्रामीणपेक्षा शहरातील महिला अत्याचाराच्या दुप्पट शिकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2020 19:02 IST2020-10-16T19:00:31+5:302020-10-16T19:02:38+5:30
crime news aurangabad वाढत्या औद्योगिकीकरणासोबत शहरातील गुन्ह्याचे प्रमाणही वाढते आहे.

ग्रामीणपेक्षा शहरातील महिला अत्याचाराच्या दुप्पट शिकार
- बापू सोळुंके
औरंगाबाद: उत्तर प्रदेशातील हाथरसमधील अत्याचाराच्या घटनेने संपूर्ण देशात संताप व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर औरंगाबाद शहर आणि ग्रामीणमधील महिला अत्याचाराच्या घटनांची घेतलेली माहिती आश्चर्यजनक आहे. ग्रामीणपेक्षा शहरात महिलांवर होणाऱ्या अत्याचाराचे प्रमाण तब्बल दुप्पट आहे.
वाढत्या औद्योगिकीकरणासोबत शहरातील गुन्ह्याचे प्रमाणही वाढते आहे. औरंगाबाद ग्रामीणमध्ये जानेवारी ते सप्टेंबर या ९ महिन्यांच्या कालावधीत बलात्काराच्या ३८ घटनांची नोंद झाली. गतवर्षी या कालावधीत ४७ महिलांवर अत्याचार आणि विनयभंगाच्या १०० घटना घडल्या. याच कालावधीत औरंगाबाद शहरात बलात्काराचे ६२ गुन्हे नोंद झाल्याचे पोलीस आयुक्तालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. ग्रामीणमध्ये विनयभंगाच्या ११९, तर शहरात १८१ घटनांची नोंद झाली आहे. महिला आणि तरुणींच्या छेडछाडीचे दोन प्रकार झाले. शहरातील महिला अत्याचारांचे प्रमाण ग्रामीणच्या तुलनेत अधिक असल्याचे आकडेवारी सांगते.
हुंड्यासाठी छळाच्या तक्रारी घटल्या
हुंडा देणे, घेणे गुन्हा आहे. असे असले तरी हुंड्यासाठी विवाहितांच्या छळाचे प्रकार सुरूच आहेत. विवाहितेच्या छळाचे गतवर्षी तब्बल १७० गुन्हे ग्रामीण पोलिसांनी नोंदविले. यावर्षी मात्र या गुन्ह्यांची संख्या ४३ पर्यंत खाली आली.
१८ महिलांचे घेतले हुंड्याने बळी
हुंड्यासह अन्य कारणांवरून विवाहितेचा शारीरिक आणि मानसिक छळ करून आत्महत्येस प्रवृत्त करणे आणि मृत्यूस कारणीभूत ठरणाऱ्या घटना मात्र थांबत नाहीत. ग्रामीण भागात ९ महिन्यांच्या अवधीत १८ महिलांनी छळाला कंटाळून जीवन संपविले.
दोषसिद्धी केवळ 30%
महिलांवरील गुन्ह्यांतील आरोपींचे गुन्हे सिद्ध होऊन शिक्षा होण्याचे सरासरी प्रमाण ३० टक्के असल्याचे सूत्रांनी सांगितले.