भरधाव ट्रकने चिरडल्याने महिला ठार; मुलीसह पती जखमी, नागरिकांचा रास्ता रोको
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2025 16:17 IST2025-11-08T16:16:26+5:302025-11-08T16:17:14+5:30
हा अपघात अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या कामामुळे झाल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे नागरिकांनी धुळे-सोलापूर महामार्गावर दोन्ही बाजूंनी रास्ता रोको करून निषेध नोंदविला.

भरधाव ट्रकने चिरडल्याने महिला ठार; मुलीसह पती जखमी, नागरिकांचा रास्ता रोको
छत्रपती संभाजीनगर : धुळे - साेलापूर राष्ट्रीय महामार्गावरून एकोड पाचोड या गावी जात असताना मोपेडवरील तिघे खाली पडले. त्याच वेळी भरधाव वेगातील दहा टायरच्या गाडीने चिरडल्याने महिलेचा जागीच मृत्यू झाला. ही घटना महामार्गावरील देवळाई चौकाजवळ शुक्रवारी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास घडली. यात वडील व मुलगीही जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.
प्रीती शिवाजी बोंगाने (३०, रा. एकोड पाचोड) असे मृत महिलेचे नाव आहे. पती शिवाजी रामनाथ बोंगाने आणि मुलगी श्रावणी ऊर्फ परी हे दोघे जखमी झाले. बोंगाणे कुटुंब गांधेली परिसरात कामाला आहे. ते दवाखान्याच्या कामानिमित्त शहरात आले होते. काम आटोपून गावाकडे मोपेडने (एमएच २० - एचएम ६३८) जात होते. रेणुकामाता कमानीपासून सोलापूर-धुळे महामार्गावर गेले. देवळाई चाैकाच्या परिसरात रस्त्याचे काम सुरू आहे. त्या ठिकाणी बोंगाने यांची दुचाकी घसरली. त्यात बाप-लेक एका बाजूला पडले. तर दुसऱ्या बाजूला प्रीती या पडल्या. त्याच वेळी जवळूनच दहा टायरचा एक ट्रक भरधाव निघून गेला. या ट्रकचे चाक प्रीती यांच्या अंगावरून गेल्यामुळे त्या जागीच ठार झाल्याची माहिती चिकलठाणा पोलिसांनी दिली. त्यानंतर घटनास्थळी नागरिकांनी गर्दी केली. सातारा व चिकलठाणा पोलिसांनीही घटनास्थळी धाव घेतली.
कारवाईसाठी नातेवाइकांचा रास्ता रोको
घटनेची माहिती मिळताच एकोड पाचोडमधील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. हा अपघात अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या कामामुळे झाल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे नागरिकांनी धुळे-सोलापूर महामार्गावर दोन्ही बाजूंनी रास्ता रोको करून निषेध नोंदविला. महामार्गास ठिकठिकाणी तीन इंचांपर्यंत तडे पडले असून, त्यामुळे दुचाकीस्वारांना गंभीर अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे संबंधित रस्त्याच्या कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी मृतदेह घटनास्थळावरून हलवू देण्यास नागरिकांनी नकार दिला. त्यामुळे महामार्गावरील वाहतूक दोन तासांपेक्षा अधिक काळ खोळंबली होती. पाच किलोमीटरपर्यंत रांगा लागल्या. पोलिसांनी नातेवाइकांची समजूत घालत संबंधितांवर कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर मृतदेह घटनास्थळावरून हलविण्यात आला. त्यानंतर वातावरण निवळले.