बायपासवर मोपेडस्वार महिलेला ट्रकने चिरडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2019 18:43 IST2019-03-08T18:41:13+5:302019-03-08T18:43:13+5:30
मागून आलेला वेगातील ट्रकने बावळे दाम्पत्याच्या मोपेडला जोराची धडक दिली.

बायपासवर मोपेडस्वार महिलेला ट्रकने चिरडले
औरंगाबाद: किराणा सामान खरेदी करून घरी जाणाऱ्या मोपडेस्वार दाम्पत्याला ट्रकने धडक दिल्यानंतर मोपेडवरून पडून महिला ट्रकच्या मागील चाकाखाली येऊन ठार झाली. हा अपघात बीड बायपासवरील एमआयटी कॉलेजजवळ शुक्रवारी दुपारी दिड वाजेच्या सुमारास घडला. यात महिलेचा पती किरकोळ जखमी झाला असून त्याला खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
स्नेह मनोज बावळे (वय ३०,रा. गोल्डन सिटी,पैठणरोड)असे मृत महिलेचे नाव आहे. तर स्नेह यांचा पती मनोज दिगंबर बावळे हे जखमी झाले. या भीषण अपघाताविषयी सातारा पोलिसांनी सांगितले की, पैठण रोडवरील गोल्डन सिटी येथील रहिवासी मनोज आणि स्नेह बावळे हे कुटुंब गुरूवारी दुपारी किराणा सामान खरेदी करण्यासाठी शहरात आले होते. किराणा सामान, भाजीपाला खरेदी करून बावळे दाम्पत्य मोपेडने बीड बायपासमार्गे दुपारी दिड वाजेच्या सुमारास घरी जात होते. यावेळी मनोज हे मोपडे चालवित होते तर स्नेह सामानाचे कॅरेट पकडून मोपेडच्या मागील सीटवर बसलेल्या होत्या. दुपारी १२ ते ५ या कालावधीत बायपासवर जडवाहनांना प्रवेश असल्याने या मार्गावर मालवाहू ट्रकांसह अन्य वाहनांची गर्दी होती.
दिड वाजेच्या सुमारास बावळे दाम्पत्य एमआयटी कॉलेज वाहतूक सिग्नलपासून ५० ते ६० फुट मागे होते. त्यावेळी सिग्नलचा दिवा हिरवा लागल्याने त्यांच्या मागून आलेला वेगातील ट्रकने बावळे दाम्पत्याच्या मोपेडला जोराची धडक दिली. यामुळे मोपेडस्वार स्नेह उजव्या बाजूला रस्त्यावर पडल्या आणि ट्रकच्या मागील चाकाखाली आल्या तर मनोज हे मोपेडसह रस्त्याच्या डाव्या बाजूला मोपडसह पडले. या घटनेत स्नेहच्या डोक्यावरून ट्रकचे चाक गेल्याने त्या घटनास्थळीच ठार झाल्या तर त्यांच्या पतीला किरकोळ दुखापत झाली. या घटनेची माहिती मिळताच सातारा आणि वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.