सुसाट वाळूच्या हायवाने महिलेला चिरडले; क्रेनने काढावा लागला मृतदेह
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2025 11:35 IST2025-01-30T11:35:04+5:302025-01-30T11:35:46+5:30
चिकलठाण्यात जिल्हा रुग्णालयासमोर घटना

सुसाट वाळूच्या हायवाने महिलेला चिरडले; क्रेनने काढावा लागला मृतदेह
छत्रपती संभाजीनगर : सुसाट जाणाऱ्या वाळूच्या हायवाच्या चाकाखाली येऊन मालनबाई विनायक चौधरी (५०) यांचा मृत्यू झाला. बुधवारी (दि. २९) रात्री ८.३० वाजता चिकलठाण्यातील जिल्हा रुग्णालयासमोर हा अपघात झाला.
केम्ब्रिज चौकातील सुंदरवाडीत राहणाऱ्या मालन कामानिमित्त चिकलठाण्यात गेल्या होत्या. काम आटोपून त्या रुग्णालयासमोर त्या रस्ता ओलांडत हाेत्या. त्याच वेळी मुकुंदवाडीकडून केम्ब्रिज चौकाच्या दिशेने हायवा भरधाव वेगात चालला होता. रस्ता ओलांडणाऱ्या मालन हायवाच्या समोरील चाकाखाली चिरडल्या गेल्या. स्थानिकांनी धाव घेत त्यांना रुग्णालयात दाखल केले. मात्र, डोके, पोट चिरडले गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला होता. घटनेची माहिती कळताच एमआयडीसी सिडकोचे निरीक्षक गजानन कल्याणकर यांनी घटनास्थळी धाव घेतली.
क्रेनने काढावा लागला मृतदेह
हायवाचा वेग इतका होता की महिलेला चिरडल्यानंतर तो काही अंतरावर जाऊन थांबला. त्यात चाकाखाली अडकल्याने मालन यांचा मृतदेह क्रेन लावून काढावा लागला. गेल्या अनेक दिवसांपासून स्थानिक येथे गतिरोधकाची मागणी करत आहेत. मात्र, पोलिस प्रशासनासह बांधकाम विभाग त्याकडे साफ दुर्लक्ष करत आहेत. परिणामी, सातत्याने येथे अपघात घडत आहेत.