डॉक्टरला घरी बोलावून महिलेचे अश्लील चाळे, पतीने व्हिडिओकरून मागितली ५ लाखांची खंडणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2025 18:17 IST2025-05-31T18:15:25+5:302025-05-31T18:17:08+5:30

डॉक्टरला सात तास घरात कोंडले; महिलेसह कुटुंबाचा कट, दोघांना अटक

Woman calls doctor to her house and sexually assaults him, husband records video and demands ransom of Rs 5 lakh | डॉक्टरला घरी बोलावून महिलेचे अश्लील चाळे, पतीने व्हिडिओकरून मागितली ५ लाखांची खंडणी

डॉक्टरला घरी बोलावून महिलेचे अश्लील चाळे, पतीने व्हिडिओकरून मागितली ५ लाखांची खंडणी

छत्रपती संभाजीनगर : तपासणीचे नाटक करून डॉक्टरला उपचारासाठी घरी बोलावून खोलीत नेत आक्षेपार्ह कृत्य करून महिलेसह तिच्या कुटुंबाने ब्लॅकमेल केले. मोबाइलमध्ये चित्रीकरण करून ५ लाखांची खंडणी मागत खिशातील ७८ हजार रुपये लुटले. डॉक्टरने या घटनेनंतर हर्सूल पोलिसांकडे तक्रार करताच महिलेसह तिच्या संपूर्ण कुटुंबावर गुन्हा दाखल करण्यात आला.

शकुंतला सांडू लहाने (४०), सांडू लहाने (४७, दोघे रा. हरसिद्धी माता मंदिराच्या मागे, हर्सूल), शकुंतलाचा जावई गणेश भालकर व त्याच्या पत्नीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. खुलताबाद तालुक्यातील ५० वर्षीय आयुर्वेदिक डॉक्टरांशी २८ मे रोजी महिलेने संपर्क साधला होता. एका पायाने चालता येत नाही. त्यासाठी आयुर्वेदिक उपचार घ्यायचे असून, डॉक्टरांना घरी येण्याची विनंती शकुंतलाने केली. सकाळी ११.३० वाजेपर्यंत डॉक्टर लहानेच्या घरी पोहोचले. शकुंतला आतील खोलीत होती. डॉक्टर तपासणीसाठी आत जाताच तिने त्यांच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी पती सांडूने मोबाइलमध्ये त्याचे चित्रीकरण करून आरडाओरडा सुरू केला. डॉक्टरांनी तसे न करण्याची विनंती केली. मात्र, दोघांनी व्हिडीओ व्हायरल न करण्यासाठी ५ लाखांच्या खंडणीची मागणी केली.

सात तास घरात कोंडले
हा धिंगाणा सुरू असतानाच शकुंतलाचा जावई, मुलगी तेथे पोहोचले. त्यांनी डॉक्टरला धमकावत खिशात हात घालून शेतीच्या साहित्यासाठी आणलेले ७८ हजार रोख काढून घेतले. जागेवर आणखी पैशांची मागणी केल्याने डॉक्टरांनी ऑनलाइन ८ हजार रुपये पाठवले. परत गुरुवारपर्यंत पैसे न दिल्यास व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिली. सायंकाळी ६ वाजेपर्यंत त्यांनी डॉक्टरला घरात कोंडून धमकावले.

गुन्हा दाखल होताच महिला पसार
डॉक्टरांनी याप्रकरणी हर्सूलच्या निरीक्षक डॉ. सुनीता मिसाळ यांच्याकडे तक्रार केली. त्यात गुन्हा दाखल झाल्याचे कळताच शकुंतला, तिची मुलगी पळून गेल्या. उपनिरीक्षक गणेश केदार यांनी तिचा जावई गणेश भालकर (२८, रा. चेतनानगर) व पती सांडूला अटक केली. न्यायालयाने त्यांना २ दिवस पाेलिस कोठडी सुनावली. या कुटुंबाने आणखी कोणाला असे लुटलेय का, याचा तपास सुरू असल्याचे केदार यांनी सांगितले.

Web Title: Woman calls doctor to her house and sexually assaults him, husband records video and demands ransom of Rs 5 lakh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.