पैठण रोडचे सेंटर अलाइनमेंट दोन मीटर सरकवावे लागणार ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2024 19:59 IST2024-12-23T19:58:42+5:302024-12-23T19:59:04+5:30
तज्ज्ञांकडून मंथन सुरू : नॅशनल हायवेची परवानगी घ्यावी लागणार

पैठण रोडचे सेंटर अलाइनमेंट दोन मीटर सरकवावे लागणार ?
छत्रपती संभाजीनगर : शहरासाठी टाकण्यात आलेल्या २५०० मिमी व्यासाच्या जलवाहिनीवर गुळगुळीत डांबरी रस्ता करण्यात आला. त्यामुळे नवीन वाद उफाळून आला. आता पैठण रोडचे सेंटर अलाइनमेंट दोन मीटरने हलवण्यावर मंथन सुरू झाल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. त्यासाठी नॅशनल हायवेकडून परवानगी घ्यावी लागणार आहे.
पैठण रोड ३० मीटर म्हणजेच १०० फूट रुंद करण्याचे ठरले. त्यातील ८ मीटर जागा जलवाहिनीसाठी एका बाजूने सोडण्यात आली. नॅशनल हायवेने फक्त २२ मीटर अंतरावरच रस्त्याचे काम करणे अपेक्षित होते. त्यांनी पूर्ण ३० मीटर रस्त्याचे काम केले. त्यामुळे जवळपास २० किलोमीटर रस्ता जलवाहिनीवर येत आहे. रस्ता २२ मीटर करताना त्यांची सेंटर अलाइनमेंट ११ मीटरवर ठेवायला हवी होती. आता सेंटर अलाइनमेंट त्यांनी १५ मीटरवर ठेवली. जलवाहिनीवरून वाहतूक सुरू करता येणार नाही. एका बाजूला रस्ता मोठा तर दुसऱ्या बाजूला कमी होईल. रस्त्याचे सेंटर अजूनही ११ मीटरवर करणे नॅशनल हायवेला शक्य आहे. सूत्रांच्या माहितीनुसार जलवाहिनीवर रस्ता येणार नाही, त्यासाठी काय करता येईल, यावर मंथन सुरू झाल्याचे सांगण्यात आले. पुढील आठवड्यात नॅशनल हायवे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणला विभागीय आयुक्त, शासन आणि खंडपीठात यासंदर्भातील माहिती द्यावी लागेल. यावर उपाय काय, हे सुद्धा सांगावे लागेल.
कामावर परिणाम नाही
पैठण रोडवर जलवाहिनी टाकण्यात आली. लवकरच जलवाहिनीवर एअर व्हाॅल्व्हसुद्धा उभारण्यात येतील. एकूण ८ ठिकाणी मोठे एअर व्हॉल्व्ह राहतील. एका एअर व्हॉल्व्हच्या बाजूने किमान १२ फुटांची सिमेंट क्राँक्रिटची भिंत उभारली जाईल. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने जलवाहिनीची जोडणी आणि अन्य कामे थांबविली नाहीत. ती कामे सुरूच आहेत. मार्च किंवा एप्रिलमध्ये नक्षत्रवाडीपर्यंत पाणी आणण्याचे उद्दिष्ट असल्याचेही सूत्रांनी सांगितले.