एका तासात ४५ लाख लिटर पाणी ओढणार; जायकवाडीतील जॅकवेलवर ३७०० हॉर्सपॉवरची मोटार
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2025 19:47 IST2025-11-24T19:47:13+5:302025-11-24T19:47:47+5:30
जॅकवेलच्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाले असून, जॅकवेलमध्ये पाणी उपसा करण्यासाठी दोन पंप बसविण्यात आले.

एका तासात ४५ लाख लिटर पाणी ओढणार; जायकवाडीतील जॅकवेलवर ३७०० हॉर्सपॉवरची मोटार
छत्रपती संभाजीनगर : नवीन पाणीपुरवठा योजनेअंतर्गत जायकवाडी धरणातील जॅकवेलवर शनिवारी ३७०० हॉर्स पॉवर क्षमतेची पहिली विद्युत मोटार क्रेनच्या साह्याने बसविली. मोटार एका तासात ४५ लाख लिटर पाणी ओढणार आहे. पाणीपुरवठा योजनेअंतर्गत हा एक मोठा टप्पा आहे.
जॅकवेलच्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाले असून, जॅकवेलमध्ये पाणी उपसा करण्यासाठी दोन पंप बसविण्यात आले. त्यावरील स्लॅबचे काम पूर्ण झाल्यानंतर ३७०० हॉर्स पॉवरची विद्युत मोटार बसविण्याचे काम शनिवारी करण्यात आले. ८० टन क्षमता असलेल्या क्रेनच्या साह्याने १६ टन क्षमतेची विद्युत मोटार उचलून पंपावर बसविण्यात आली. त्यासाठी कंपनीच्या तज्ज्ञ अभियंत्यांना व कामगारांना बोलावण्यात आले. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या मुख्य अभियंता मनीषा पलांडे आणि कार्यकारी अभियंता तुषार टेकवडे हे विद्युत मोटार बसविण्यासाठी उपस्थित होते. क्रेनच्या साह्याने पंपावर विद्युत मोटार बसविल्यानंतर योग्य रीतीने ही मोटार बसविण्यात आली आहे किंवा नाही, हे तपासण्यात आले. अखेर विद्युत मोटार बसविण्यात आल्याचा ग्रीन सिग्नल तज्ज्ञांनी दिला.
जॅकवेलचे काम अंतिम टप्प्यात
जॅकवेलचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाले असून, दुसऱ्या टप्प्याचेही काम पूर्ण होत आहे. जॅकवेलमध्ये पाणी घेण्यापूर्वी त्याची स्वच्छता करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. लवकरच सायफन पद्धतीने पाणी आणण्यात येणार आहे.
पंपाला जोडले प्रेशर व्हॉल्व्ह
जॅकवेलमध्ये बसविण्यात आलेल्या ३७०० हॉर्स पॉवर पंपातून पाणी उपसा होणार आहे.