बायको गेली माहेरी, रिक्षा चालकाने व्हिडीओ काॅल करून संपवले जीवन
By योगेश पायघन | Updated: January 30, 2023 14:48 IST2023-01-30T14:48:17+5:302023-01-30T14:48:43+5:30
भावाने समजावण्याचा प्रयत्न केला, परंतु तरुण ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हता

बायको गेली माहेरी, रिक्षा चालकाने व्हिडीओ काॅल करून संपवले जीवन
औरंगाबाद : मुकुंदवाडीतील शाहूनगरातील २९ वर्षीय रिक्षा चालकाने मावसभावाला व्हिडीओ काॅल करत गळफास घेतला. ही घटना शनिवारी घडली. अमोल उत्तम खाडे (रा.शाहूनगर, मुकुंदवाडी) असे मृताचे नाव आहे. या घटनेची नोंद मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.
अमोलचे साडेतीन वर्षांपूर्वी लग्न झाले होते. त्याला अडीच वर्षांची मुलगी असून, पत्नी सहा महिन्यांपासून माहेरी आहे. अमोल राहत असलेल्या किरायाच्या घरातून शनिवारी सायंकाळी त्याने ज्योतिनगर परिसरात राहणाऱ्या मावसभावाला व्हिडीओ काॅल करून आत्महत्या करत असल्याचे सांगितले. किचन ओट्याजवळून अमोल बोलत होता.
तिथे नायलाॅनची दोरी लटकलेली असून फास त्याने गळ्यात घातल्याचे व्हिडिओ काॅलमध्ये रेकाॅर्ड झाले आहे. अमोलला भावाने समजावण्याचा प्रयत्न केला, परंतु तोपर्यंत अमोलने गळफास घेतला. नातेवाईक, मित्रांनी त्याला घाटीत दाखल केले असता, डाॅक्टरांनी अमोलला तपासून मयत घोषित केले. पुढील तपास मुकुंदवाडी पोलिस करत आहेत. नातलगांच्या म्हणण्यानुसार, पत्नी नांदायला येत नसल्याने अमोलने आत्महत्या केली असावी.