चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून; मुलांची महत्वपूर्ण साक्षीने आरोपी पतीस जन्मठेप
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2025 13:45 IST2025-02-20T13:40:38+5:302025-02-20T13:45:01+5:30
आरोपीचा मुलगा आणि साडूचा मुलगा यांच्या साक्षी ठरल्या महत्त्वाच्या

चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून; मुलांची महत्वपूर्ण साक्षीने आरोपी पतीस जन्मठेप
छत्रपती संभाजीनगर : चारित्र्यावर संशय घेऊन चाकू आणि कुऱ्हाडीचे वार करून पत्नी माया हिची निर्घृण हत्या करणारा आरोपी लहू भागाजी साळवे (२७, रा. साताळा, ता. फुलंब्री) याला अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. ए. सिन्हा यांनी विविध कलमांखाली जन्मठेप आणि १५ हजार रुपये दंड ठोठावला.
दंडाची रक्कम नुकसानभरपाई म्हणून मयताच्या दोन्ही मुलांना द्यावी. तसेच विधी सेवा प्राधिकरणने भविष्यात योग्य ती भरपाई द्यावी, असे आदेशात म्हटले आहे.
काय होती घटना?
मायाचे वडील सुभाष तुपे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, मायाचा विवाह लहू साळवेसोबत झाला होता. लहू मूळचा साताळ्याचा आहे. मात्र, तो कामानिमित्त वडिलांसोबत नाशिक येथे राहत होता. माया दोन मुलांसह माहेरी राहत होती. घटनेच्या ४ महिन्यांपूर्वी लहूदेखील सासुरवाडीत राहण्यासाठी आला होता. तो मायाच्या चारित्र्यावर संशय घेऊन नेहमी मारहाण करीत असे. २ जून २०२० रोजी सकाळी सुभाष हे नातवासोबत लामणगाव (ता. खुलताबाद) येथे दुचाकीवर गेले होते. ते परतले असता, त्यांच्या दोन नातवांनी काकांनी मावशीला कुऱ्हाड आणि चाकूने मारहाण केली असून, काका घरातून निघून गेल्याचे सांगितले. घरात माया रक्ताच्या थारोळ्यात पडलेली होती. सोफ्याजवळ रक्ताने माखलेला चाकू पडलेला दिसला. मायाला गंभीर जखमी अवस्थेत खुलताबाद येथील शासकीय रुग्णालयात नेले असता, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. याप्रकरणी खुलताबाद ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
खटल्याची सुनावणी व शिक्षा
खटल्याच्या सुनावणीवेळी सहायक लोकअभियोक्ता अरविंद बागुल यांनी १२ साक्षीदारांचे जबाब नोंदविले. त्यापैकी मयत आणि आरोपीचा मुलगा व साडूचा मुलगा यांच्या साक्षी महत्त्वाच्या ठरल्या.