अनैतिक संबंधास विरोध केल्याने पतीच्या बेदम मारहाणीत पत्नीचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2023 20:22 IST2023-12-05T20:22:29+5:302023-12-05T20:22:34+5:30

या प्रकरणी पती विरुध्द खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे

Wife killed by husband for resisting extra marital relationship | अनैतिक संबंधास विरोध केल्याने पतीच्या बेदम मारहाणीत पत्नीचा मृत्यू

अनैतिक संबंधास विरोध केल्याने पतीच्या बेदम मारहाणीत पत्नीचा मृत्यू

वाळूज महानगर : अनैतिक संबंधास विरोध करते म्हणून पतीने पत्नीला बेदम मारहाण करून तिचा खून केल्याची घटना रांजणगाव शेणपुंजी येथे रविवारी (दि.३) घडली. याप्रकरणी पतीविरुद्ध एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रियंका संदीप राऊत (२८, रा.रांजणगाव) असे खून झालेल्या विवाहितेचे नाव आहे. तिचा पती संदीप याचे गावातील एका महिलेसोबत अनैतिक संबंध होते. यामुळे पती-पत्नीत कायम खटके उडत होते. संदीप हा पत्नीला मी त्या बाई सोबतच राहणार असून तुला सोडून देणार, अशी धमकी देत तिला सतत मारहाण करीत असे. या प्रकाराची माहिती प्रियंकाने आपल्या माहेरी दिली होती. प्रियंकाचे आई-वडील व भावाने संदीपला अनेकदा समजावून सांगितले होते. ३ नोव्हेंबरला संदीपने सासू विमलबाई यांच्याशी संपर्क साधून माझे व प्रियंकाचे भांडण झाले असून तिला तुम्ही घेऊन जा, असे सांगितले.

दरम्यान, प्रियंकाने भाऊ आनंदशी संपर्क साधून पतीने मला खूप मारहाण केली असून शहरातील मध्यवर्ती बसस्थानकात आले असल्याचे सांगितले. आनंद तेथे येऊन बहिणीस घरी घेऊन गेला. दुसऱ्या दिवशी प्रियंकाच्या छातीत व पोटात दुखत असल्याने आनंदने तिला शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. प्राथिमक उपचारानंतर तिला सुटी देण्यात आली. रविवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास तिला त्रास होत असल्याने भावाने तिला सोबत घेऊन पोलिस ठाणे गाठले. मात्र, तिला जास्तच त्रास होऊ लागल्याने तत्काळ रुग्णालयात भरती करण्यात आले. डॉक्टरांनी तपासून तिला मृत घोषित केले.

पती विरुध्द खुनाचा गुन्हा दाखल
अनैतिक संबंधास विरोध करणाऱ्या संदीप याने पत्नी प्रियंकाला मारहाण केल्याने गंभीर जखमी होऊन तिचा मृत्यू झाला. या प्रकरणी मृताचा भाऊ आनंद गणेश डेरे यांच्या फिर्यादीवरून आरोपी मेव्हणा संदीप रामदास राऊत (३०, रा.रांजणगाव ) याच्या विरुध्द खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी आरोपीला अटक केली. उप निरीक्षक संदीप पागोटे हे तपास करीत आहेत.

Web Title: Wife killed by husband for resisting extra marital relationship