आमचे जन्मदाते कोण? दत्तक गेलेली मुले जेव्हा देश-विदेशातूनही आई-वडिलांचा पत्ता शोधत येतात
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2025 19:03 IST2025-11-14T19:02:24+5:302025-11-14T19:03:15+5:30
भारतीय समाजसेवा केंद्राने अनेक मुलांची घडविली कुटुंबाशी भेट

आमचे जन्मदाते कोण? दत्तक गेलेली मुले जेव्हा देश-विदेशातूनही आई-वडिलांचा पत्ता शोधत येतात
- प्राची पाटील
छत्रपती संभाजीनगर : २००८ मध्ये विदेशातील २३ वर्षीय मुलीने तिच्या आई-वडिलांची चौकशी केली. मराठवाड्यातील जिल्ह्यातून आई-वडिलांनी मुलीला संस्थेत सोडले होते. चौकशी केल्यावर समजले की आई-वडील जगात नाहीत. मात्र, त्या मुलीचे बहीण-भावंड होते. बहिणीने भेटायची तयारी दर्शवली आणि बहीण-भावंडांचे अनोखे मिलन संस्थेने घडवून आणले. त्या गावात विदेशातून आलेल्या मुलीचे बॅण्ड लावून स्वागत झाले. भारतीय समाजसेवा केंद्राच्या शाखा संचालिका छाया पवार बोलत होत्या.
भारतीय समाजसेवा केंद्राच्या छत्रपती संभाजीनगर शाखेला आज ३० वर्षे पूर्ण झाली. आजपर्यंत ५३८ बाळांना दत्तक प्रक्रियेमार्फत हक्काचे घर मिळाले आहे. तर १३०९ मुलांचा सांभाळ संस्थेने केला आहे. सध्या इथे १५ बालके आहेत. दत्तक गेलेली मुले आपल्या पहिल्या घराला भेट देण्यासाठी येतात. त्यांचा आग्रह असतो की आमचे जन्मदाते कोण आहेत ते सांगा, एकदा तरी त्यांना भेटू द्या. खऱ्या आई-वडिलांना भेटण्याची इच्छा असेल तर संस्था ताटातूट झालेल्यांची एकदा भेट घालून देते.
परदेशातून आले पत्र
विदेशात दत्तक गेलेल्या मुलाने पालकांसाठी एक पत्र पाठवले. शोध घेतल्यावर लक्षात आले की, १९९४ मध्ये आई-वडिलांनी त्याला जन्मानंतर एक आजार असल्यामुळे संस्थेत सोडले. सर्व्हेच्या बहाण्याने कर्मचारी त्यांच्या घरी पोहोचले. त्यांची पत्नी या जगात नव्हती. सुना-नातवंडांनी भरलेले ते घर होते. वडील म्हणाले, आम्ही आमच्या मुलाला कधीच विसरू शकलो नाही. मुलाचे पत्र वाचून वडील धाय मोकलून रडले. मुलगा आनंदात, सुखात आहे हे पाहून ते सुखावले. मात्र, पुढे त्यांनी मुलाला भेटायला नकार दिला. त्यांच्या कुटुंबीयांचे फोटो परदेशात असलेल्या मुलाला पाठवले गेले.
आईचे नाव सांगा
१० वर्षांची मुलगी तिच्या पालकांसोबत संस्थेत आली. तिला तिच्या जन्मदात्या आईला भेटायचे होते. मात्र, ती सज्ञान नसल्यामुळे संस्था काहीही करु शकणार नव्हती. तिने खूप रडत रडतच हट्ट केला की, मला माझ्या आईचे पहिले नाव तरी सांगा. तिला संस्थेने १८ वर्षांची झाल्यानंतर तू ये असे सांगितले. ती मुलगी काही वर्षांनी नक्की येईल असे छाया पवार म्हणाल्या.