दुचाकीवर तणावात आली चक्कर त्यात चेनमध्ये अडकला पदर; मुलासमोरच आईचा करूण अंत!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2025 14:39 IST2025-02-01T14:37:27+5:302025-02-01T14:39:30+5:30
मुलासोबतत्याच्या स्पोर्टबाइकवरून जाताना चेनमध्ये साडीचा पदर अडकल्याने अपघात; छत्रपती संभाजीनगर-जळगाव रस्त्यावर चिंचखेडानजीक घटना

दुचाकीवर तणावात आली चक्कर त्यात चेनमध्ये अडकला पदर; मुलासमोरच आईचा करूण अंत!
सिल्लोड ( छत्रपती संभाजीनगर) : भरधाव दुचाकीच्या चेनमध्ये पदर व स्कार्प अडकून डोक्यावर आपटल्याने झालेल्या अपघातात एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना छत्रपती संभाजीनगर-जळगाव मार्गावर सिल्लोड तालुक्यातील चिंचखेडा गावाजवळ गुरुवारी सायंकाळी ५ वाजेदरम्यान घडली. मनीषा कैलास चौधरी (वय ४८ वर्ष रा. पहूर, ता.जामनेर) असे मयत महिलेचे नाव आहे.
जळगाव जिल्ह्यातील पहूर येथील रहिवासी मनीषा चौधरी या आपला मुलगा ऋषीकेशसोबत दुचाकी (एमएच १९ ईसी ३८७९) ने छत्रपती संभाजीनगर येथे एका फायनान्स कंपनीत कर्जाचे सेटलमेंट करण्यासाठी गुरुवारी सकाळी गेल्या होत्या. तेथून गावाकडे परतताना सिल्लोड तालुक्यातील चिंचखेडा गावानजीक दुचाकीवर पाठीमागे बसलेल्या मनीषा यांच्या साडीचा पदर तसेच स्कार्प हा दुचाकीच्या चेनमध्ये अडकला. यामुळे त्या वेगाने रस्त्यावर फेकल्या गेल्या. झटका बसल्याने दुचाकीही खाली पडली. डोक्यावर पडल्याने मनीषा या गंभीर जखमी होऊन निपचित पडल्या. तर ऋषिकेशला कोणतीही इजा झाली नाही. मात्र तो घटनेनंतर प्रचंड घाबरला होता. नागरिकांनी धाव घेत दोघा मायलेकांना तत्काळ सिल्लोड उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मनीषा यांना तपासून मयत घोषित केले. मनीषा चौधरी यांच्या पश्चात पती, दोन मुले असा परिवार आहे. चौधरी कुटुंबीयांचे पहूर येथे ऑटोमोबाईलचे दुकान आहे.
तणावामुळे आली होती चक्कर
अपघातात ठार झालेल्या मनीषा चौधरी यांच्या पतीने २०१८ मध्ये एका खाजगी फायनान्स कंपनीकडून १५ लाख रुपये होम लोन घेतले होते. कर्जाची रक्कम १५ लाख त्यांनी भरली होती; मात्र अजून फायनान्स कंपनीने त्यांच्याकडे २१ लाख थकबाकी काढली होती. पैसे भरले नाही म्हणून त्यांनी मनीषा यांच्या घराचा लिलाव करण्याची नोटीस दिली होती. कर्जाची मुदत वाढवून द्या, अशी सेटलमेंट करण्यासाठी मनीषा या आपल्या मुलासोबत छत्रपती संभाजीनगर येथील फायनान्स कंपनीच्या ऑफिसमध्ये गेल्या होत्या. मात्र फायनान्स कंपनीने त्यांचे ऐकले नाही म्हणून ते परत घराकडे निघाले होते. या तणावातच दुचाकीवर पाठीमागे बसलेल्या मनीषा यांना चक्कर आली. तेव्हा त्या डोक्याला बांधलेला स्कार्प काढताना साडीचा पदर व स्कार्प दोन्ही चेनमध्ये अडकून हा अपघात झाला.