लग्नमंडपात वधू-वर फेरे घेताना इकडे एकजण आहेराचा डब्बा घेऊन गायब

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2023 17:12 IST2023-02-11T17:12:04+5:302023-02-11T17:12:17+5:30

आहेराचा डब्बा चोरणारा अल्पवयीन व त्याचा साथीदार सीसीटीव्हीत कैद

While performing satfere the bride and groom in the wedding hall, one person disappeared with a box of gifts | लग्नमंडपात वधू-वर फेरे घेताना इकडे एकजण आहेराचा डब्बा घेऊन गायब

लग्नमंडपात वधू-वर फेरे घेताना इकडे एकजण आहेराचा डब्बा घेऊन गायब

वाळूज महानगर ( औरंगाबाद) : लग्नमंडपात वधू-वर फेरे घेत असल्याची संधी साधून अल्पवयीन चोरट्यांनी चक्क आहेराचा डब्बा लांबविल्याची घटना शुक्रवारी वाळूज महानगरात उघडकीस आली आहे. या आहेराच्या डब्ब्यातील २५ हजार रुपये लांबविणारा अल्पवयीन चोरटा व त्याचा साथीदार हॉटेलमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत.

गंगापूर येथील समीक्षा संजय जैस्वाल हिचा शुक्रवारी पहाडसिंगपुरा येथील धनराज जैस्वाल या तरुणासोबत नगर रोडवरील हॉटेल ए. एस. क्लबमध्ये विवाह सोहळा आयोजित करण्यात आला होता. या विवाह सोहळ्यासाठी वधू-वराकडील मंडळी मोठ्या संख्येने जमा झाली होती. या लग्नात आलेल्या नातेवाईक व मित्रमंडळींनी वधू समीक्षा हिला दिलेल्या आहेराचे पैसे एका स्टीलच्या डब्यात जमा करून लग्नमंडपातच हा डब्बा ठेवला होता. लग्नसोहळ्याला सुरुवात झाल्यानंतर वधू-वर फेरे घेत होते. या आनंदी क्षणामुळे संपूर्ण वऱ्हाडी मंडळीचे लक्ष वधू-वरांकडेच होते. ही संधी साधून एका १२ ते १४ वर्षे वयाचा लहान मुलगा लग्नमंडपात ठेवलेला आहेराचा डब्बा घेऊन गायब झाला. लग्नसोहळा पार पडल्यानंतर काही वऱ्हाडी पुन्हा आहेर करत असताना आहेरचा डब्बाच गायब झाल्याने नातेवाईकांनी त्याचा शोध घेतला.

आहेराचा डब्बा गायब झाल्यानंतर नातेवाईकांनी हॉटेलातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याची तपासणी केली. पांढरा शर्ट व निळ्या रंगाची पँट, डोक्यावर स्पोर्टसची टोपी घातलेला १२ ते १४ वर्षांचा लहान मुलगा आहेराचा डब्बा घेऊन लग्नमंडपातून बाहेर जाताना दिसला. लग्नमंडपातून बाहेर पडल्यानंतर या अल्पवयीन मुलासोबत काळ्या रंगाचा शर्ट व चॉकलेटी रंगाची पॅन्ट परिधान केलेला एक ३० ते ३५ वर्षाचा इसम रस्त्याने जाताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. याप्रकरणी वधूचे चुलते मनोज जैस्वाल यांनी २५ हजारांचा आहेराचा डब्बा लांबविणाऱ्या दोघांविरुध्द एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

Web Title: While performing satfere the bride and groom in the wedding hall, one person disappeared with a box of gifts