प्रत्येक कलाकृती साकारताना मागील यश, अपयशाकडे पाहत नाही: आशुतोष गोवारीकर
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2025 18:55 IST2025-01-17T18:54:59+5:302025-01-17T18:55:21+5:30
अजिंठा-वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव

प्रत्येक कलाकृती साकारताना मागील यश, अपयशाकडे पाहत नाही: आशुतोष गोवारीकर
छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यातील रसिकांसाठी जगभरातील उत्कृष्ट चित्रपट सादर करणाऱ्या दहाव्या अजिंठा-वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा दुसऱ्या दिवशी गुरुवारी दुपारी सिनेदिग्दर्शक तिग्मांशू धुलिया यांनी, तर सायंकाळी महोत्सवाचे मानद अध्यक्ष तथा सिनेदिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांनी ऐतिहासिक चित्रपट निर्मितीच्या बारकाव्यांवर प्रकाश टाकला. लगान, स्वदेश, जोधा अकबर, आदी चित्रपटांच्या निर्मितीची प्रक्रिया यावेळी प्रेक्षकांसमोर मांडताना नवी कलाकृती साकारताना मागील यश-अपयशाकडे पाहत नसल्याचे गोवारीकर यांनी नमूद केले.
यावेळी सिनेदिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी आणि जयप्रद देसाई यांनी विचारलेल्या प्रश्नांना गोवारीकर यांनी उत्तरे दिली. यासोबत प्रेक्षकांशीही त्यांनी संवाद साधला. ‘लगान’ सिनेमावर शाहरूख खानने आणि ‘स्वदेश’ सिनेमावर अभिनेता अमिर खानने काय प्रतिक्रिया दिली, असा प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, दोन्ही अभिनेत्यांनी परस्परांच्या सिनेमांचे आणि अभिनयाचे कौतुक केले होते. तुम्ही मराठी असून अद्याप मराठी सिनेमा का बनवला नाही, या प्रश्नाचे उत्तर देताना त्यांनी, या वर्षी आपला मराठी चित्रपट येत असल्याचे नमूद केले.
दिल को अपने यादों में खिलना चाहता हूँ !
केंद्रीय माहिती व दूरसंचार विभागाचे सचिव संजय जाजू यांनी महोत्सवाला हजेरी लावली. यावेळी त्यांनी 'दिल को अपने यादों में खिलाना चाहता हूँ' ही कविता सादर केली.
व्यवस्थेविरुद्ध लढण्याची सामूहिक आणि संघटनात्मक भावना आज दिसत नाही. सगळे लोक छोट्या-छोट्या गटांमध्ये विभागले गेले असल्यामुळे समकालीन काळामध्ये एखाद्या व्यक्तीची समस्या ही समाजाची किंवा इतर व्यक्तीची समस्या असल्याची भावना निर्माण होताना दिसत नाही. त्यामुळे सध्याच्या स्थितीला ‘अँग्री यंग मॅन’ हे उत्तर नसून, समूहभावनेने समस्येवर काम करणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन दिग्दर्शक व अभिनेता तिग्मांशू धुलिया यांनी यावेळी केले. धूलिया यांच्याशी गुरुवारी दिग्दर्शक ज्ञानेश झोटिंग यांनी संवाद साधला.